वॉशिंग्टनमध्ये पूरसदृश परिस्थिती, व्हाईट हाऊसमध्ये ही शिरले पाणी


संयुक्त राज्य अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये गेल्या आठवड्याभरात मुसळधार पाऊस होत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने वॉशिंग्टनमध्ये थैमान घातले असून, त्यायोगे आता अनेक रस्ते आणि रेल्वेमार्गही बंद करण्यात आल्याचे समजते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणवर गैरसोय होत असताना पहावयास मिळाल्याचे वृत्त ‘एएनआय’ने प्रसिद्ध केले आहे. भरीस भर म्हणून राजधानी वॉशिंग्टन मध्ये वीजही गुल झाल्याने सामान्य जनजीवन खूपच प्रभावित झाले. याचा फटका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे औपचारिक निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसला ही बसला असून, येथील प्रेस एरियाच्या काही भागामध्ये पाणी भरले असेल्याचे समजते.

प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वॉशिंग्टन शिवाय व्हर्जिनिया आणि कोलम्बियामध्येही मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी केवळ दोन तासांतच तब्बल तीन इंच पाऊस झाल्याचे वृत्त आहे. इतक्या मुसळधार पावसामुळे शहरांतील रस्त्यांना अक्षरशः ओढ्यांचे स्वरूप आले असून व्हाईट हाऊसच्या बेसमेंट मध्येही पाणी शिरले असल्याचे समजते. या ठिकाणी बहुतांशवेळा पत्रकार परिषदा आयोजित केल्या जात असतात, म्हणून या भागाला प्रेस एरिया म्हटले जाते.

येथील स्थानिक प्रशासनाने मेट्रो क्षेत्रामध्ये आपत्कालीन स्थितीची घोषणा केली असून, खराब हवामानामुळे ‘US National Rail-road Passenger Corporation’ ने दक्षिणी वॉशिंग्टनमध्ये ट्रेनसेवा रद्द केला. ही परिस्थिती आणखी किती दिवस कायम राहणार याचा नक्की अंदाज आतापर्यंत वर्तविला गेला नसून, सुदैवाने पावसामुळे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या नुकसानाचे वृत्त नसल्याचे समजते. मात्र पावसाचे पाणी साचल्याने जॉर्ज वॉशिंग्टन पार्कवेचे क्षेत्र आणि नॉर्थवेस्ट वॉशिंग्टनच्या काही क्षेत्रांमध्ये वाहतूक बंद करण्यात आली.

कोलंबिया क्षेत्रामध्ये देखील पावसाची संततधार असून, जोरदार वादळाने विमान यातायात विस्कळीत झाली. पुढचे दोन दिवस ही हवामान खराब राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली होती. या सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी हे प्रमाण साडेतीन इंचांपेक्षाही अधिक असल्याचे समजते. वॉशिंग्टनमध्ये एका महिन्यात होणारा पाऊस एकाच दिवसात झाल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून, अनेकांच्या गाड्या पाण्यामध्ये बुडल्या असल्याचेही वृत्त आहे. पूरसदृश परिस्थिती उद्भवल्याने अग्निशमन दल आणि पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने नागरिकांना मदत पोहोचविली गेली आहे.

Leave a Comment