भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात ‘अँँटी व्हेनम’ तयार करणारा ‘स्नेक ट्राईब’


भारतातील सर्वात प्राचीन आदिवासी जमातींपैकी ‘इरुला’ ही जमात आहे. तमिळनाडू आणि केरळ राज्यांच्या सीमेलगत या जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. पारंपारिक पद्धतीने औषधोपचार ही या मंडळींची खासियत. त्यामुळे इरुला जमातीच्या औषधोपचारांमध्ये तीनशेहूनही अधिक निरनिराळ्या उपचारपद्धतींचा समावेश आहे. या ज्ञानाच्या जोडीला या जमातीतील लोकांचा अतिविषारी साप पकडण्यात आणि ते लीलया हाताळण्यातही हातखंडा आहे. ‘बेटर इंडिया’च्या वतीने प्रसिद्ध केल्या गेलेल्या रिपोर्टच्या अनुसार काही दशकांपूर्वीच्या काळामध्ये इरुला जमातीचे लोक सर्प पडकून, त्यांची कातडी विकून आपली गुजराण करीत असत. ही कातडी, कातडे कमाविणाऱ्या लोकांना विकली जात असे. तिथे या कातडीवर प्रक्रिया करून ही कातडी युरोप आणि अमेरिकेमध्ये निर्यात केली जात असे. मात्र १९७२ साली ‘वन्यजीवन संरक्षण कायदा’ पारित करण्यात आल्यानंतर सर्पांसहित इतरही अनेक प्राण्यांच्या शिकार करण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली. त्यामुळे इरुला जमातीचे एकमात्र उपजीविकेचे साधनही संपुष्टात आले.

जगभरामध्ये दरवर्षी सुमारे तीस ते चाळीस हजार लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडत असतात. सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्या एकूण लोकांपैकी सुमारे पंचवीस टक्के लोक भारतातील असतात. सर्पदंश झाला असता, त्वरित ‘अँटीव्हेनम सिरम’ दिले गेले तरच मनुष्याचे प्राण वाचविण्यात यश मिळू शकते. सर्पाचे विष घोड्यांमध्ये थोडे थोडे इंजेक्ट केले जाऊन घोड्यांच्या शरीरामध्ये या विषाची प्रतिकारशक्ती तयार करून त्याद्वारे अँटीव्हेनम सिरम तयार करण्यात येते. सर्पदंशावर हे सिरम हा एकमेव प्रभावी उपचार असल्याने याला मागणीही मोठी असते. तसेच अगदी थोड्या मात्रेमध्ये अँटीव्हेनम सिरम तयार करण्यासाठी अनेक सापांचे विष उपयोगात आणावे लागत असते. हीच आवश्यकता रोमोलस व्हिटेकर नामक प्रसिद्ध हर्पेटोलॉजिस्ट आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशनिस्ट, इरुला जमातीच्या लोकांच्या सहाय्याने पूर्ण करीत आहेत. इरुला जमातीतील लोकांचे सर्प पकडण्याचे आणि हाताळण्याचे कौशल्य ठाऊक असल्याने गेली पन्नास वर्षे व्हिटेकर या जमातीच्या लोकांसोबत काम करीत आहेत. याद्वारे त्यांनी इरुला जमातीच्या लोकांना उपजीविकेचे नवे साधनही मिळवून दिले आहे.

व्हिटेकर यांनी इरुला जमातीतील लोकांना हाताशी घेऊन, ‘इरुला स्नेक कॅचर्स सहकारी संस्थे’ची स्थापना केली असून, १९७८ सालापसून चेन्नई शहराच्या नजीक ही संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी सर्प ठेवले जाऊन त्यांच्यापासून अँटीव्हेनम सिरम तयार करण्याचे काम केले जात आहे. आजच्या काळामध्ये या संस्थेद्वारे संपूर्ण देशभरातील इस्पितळांमध्ये अँटीव्हेनम सिरमचा पुरवठा करण्यात येत असल्याने सर्पदंश झालेल्या लाखो लोकांचे प्राण त्यामुळे वाचू शकलेले आहेत. मात्र सर्पांपासून विष मिळविण्याचे काम वाटते तितके सोपे खचितच नाही. विष मिळविण्यासाठी सर्प पकडणे आणि ते हाताळणे यामध्ये मोठा धोका आहे. सर्पाने टाकलेल्या कातीवरून आणि विष्ठेवरून सर्प नक्की कुठे सापडणार याचा अंदाज इरुला घेतात. एकदा सर्प कुठे असेल याचा अंदाज आल्यानंतर एका लहानश्या क्रो-बारच्या सहाय्याने जमीन उकरून एका झटक्यात सर्प पकडला जातो. एका दिवसामध्ये एक ते तीन साप सापडतात. साप पकडताना मात्र तो निरोगी आणि पूर्ण वाढ झालेला सर्प असल्याची खात्री केल्यानंतरच सर्प पकडला जातो. एकदा सर्प पकडला गेला, की त्याची अतिशय काळजी घ्यावी लागते. प्रत्येक सर्पाला साधारण तीन आठवडे बंदिस्त करून ठेवले जाऊन त्यापासून तीन ते चार वेळा विष मिळविले जाते. त्यानंतर हे सर्प पुन्हा जंगलात सोडून देण्यात येतात. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्पाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यांची पुरेपूर काळजी घेतली जाते.

इरुला स्नेक कॅचर्स सहकारी संस्था गेली अनेक वर्षे हे कार्य अखंड करीत असून, त्याद्वारे इरुला जामातीच्या लोकांना उपजीविकेचे साधनही उपलब्ध झाले आहे. आता संस्थेचे दैनंदिन व्यवहार पाहण्यापासून ते सर्प पकडणे, त्यांच्यापासून विष मिळवून त्यावर प्रक्रिया करून अँटीव्हेनम सिरम तयार करण्यापर्यंत सर्वच कामे इरुला लोक मोठ्या कौशल्याने हाताळत असतात.

Leave a Comment