‘हम आपके…’ची पंचवीशी, अनेक कलाकार आनंदोत्सवात सहभागी


सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला प्रदर्शित झाल्याला नुकीतच पंचवीस वर्षे पूर्ण झाली. पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या चित्रपटाचे संगीत आणि सर्व कलाकारांनी साकारलेला उत्तम अभिनय यांमुळे या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती राजश्री प्रोडक्शनसची होती. सलमान आणि माधुरीच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अनुपम खेर, रीमा लागू, सतीश शहा, आलोक नाथ, मोहनीश बेहल, रेणुका शहाणे, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या अनेक मातब्बर कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाला पंचवीस वर्षे झाल्याच्या निमित्ताने माधुरी, सलमान सहित इतरही अनेक कलाकारांनी या निमित्ताने आयोजित खास समारंभाला हजेरी लावली.

पाच ऑगस्ट १९९४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका सलमानने तर नायिकेची भूमिका माधुरीने साकारली होती. कोणत्याही प्रकारचे हिंसक प्रसंग नसलेला हा पूर्णतया कौटुंबिक कथेवर आधारित चित्रपट लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच पसंतीची पावती मिळवून गेला. इतकेच नव्हे, तर आज पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतरही या चित्रपटाच्या आठवणी, त्यातील गीते आज ही प्रेक्षकांच्या मनामध्ये ताजी आहेत. चित्रपटाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याप्रसंगी आयोजित समारंभात माधुरी, सलमान सह रेणुका शहाणे, सतीश शहा, इत्यादी कलाकार उपस्थित होते.

बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा ‘हम आपके है कौन’ हा प्रथम चित्रपट ठरला होता. हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘नदिया के पार’ या चित्रपटाचा रीमेक असून, या चित्रपटामध्ये सचिन, साधना सिंह, इंदर कुमार, आणि मिताली या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Leave a Comment