पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या पॅकेट्सवर भाजपची जाहिरातबाजी


मुंबई : महाराष्ट्र सरकारचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर पूरग्रस्तांना मदत करताना केलेल्या सेल्फी प्रदर्शनानंतर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठल्यानंतर आणखी असाच एक भाजपचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर लावले आहेत. भाजप सरकार पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये देखील चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

हा अत्यंत संतापजनक प्रकार असून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे सरकारच्या पैशांवर जाहिरातबाजी करणे योग्य नाही. ह्या लोकांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर प्रसिद्धीसाठी वाटेल ते पाऊल सरकार उचलत ही चमकोगिरी करत आहेत. छुप्या पद्धतीने हे स्टिकर कार्यकर्त्यांना लावायला सांगितले असतील, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

पूर परिस्थिती ओसरल्यानंतर शासनाचा मदतीसंदर्भात निर्णय आल्यानंतर आम्ही तातडीने बैठक घेऊन धान्याची मदतीसाठी आम्ही पॅकेट्स तयार केली. हे फोटो रेशन दुकानदारांनी लावले. शासनाची ही मदत असून रेशन दुकानदारांच्या कमिटीला मी बोललो आहे. महाराष्ट्र शासन लिहिणे अपेक्षित आहे. पण हे फोटो रेशन दुकानदारानी लावले. ते स्टिकर काढण्याबाबत आता सांगितले जाईल, असे स्पष्टीकरण आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिले आहे. तसेच या प्रकारावर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.


दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टिकर छापायला. पूरग्रस्तांना तब्बल 2 दिवस मदत स्टिकर छापण्यासाठी दिली नाही. लेकरे-बाळे उघड्यावर पडली आहेत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टिकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजीसाठी लोकांना उपाशी माराल, अशी टीका केली आहे.

Leave a Comment