तब्बल तेवीस हजार डॉलर्स किंमतीच्या नोटा नजरचुकीने कचऱ्याच्या टोपलीत जातात तेव्हा…


अमेरिकेतील ओरेगॉनमधील अॅशलंड शहरामध्ये राहणारा एक तरुण सध्या आपल्या नशिबावर भलताच खुश आहे. आणि का असू नये, त्याने चुकून कचऱ्यात टाकून दिलेले तबल तेवीस हजार डॉलर्स, काही डॉलर्सची रक्कम वगळता त्याला जसेच्या तसे परत मिळाले असल्याचे वृत्त ‘इनसायडर’ने प्रसिद्ध केले आहे. संबंधित वृत्तामध्ये या माणसाच्या नावाविषयी गुप्तता बाळगण्यात आली आहे. झाले असे, की या माणसाने तब्बल तेवीस हजार डॉलर्स किंमतीच्या नोटा एका बुटांच्या जुन्या खोक्यात ठेवल्या होत्या. मात्र काही दिवसांनी त्याने हे खोके जुने दिसत असल्याने रीसायकल होण्यासाठी जाणाऱ्या कचऱ्यात टाकून दिले. या खोक्यामध्ये आपण तेवीस हजार डॉलर्स ठेवले असल्याचा साफ विसर त्याला पडला.

आपण पैसे ठेवले असलेले खोके जेव्हा रिसायकल होण्यासाठी जाणाऱ्या कचऱ्यात टाकल्याचे त्याच्या लक्षात आले, तेव्हा हा कचरा गोळा करण्यासाठी आलेला ट्रक हे खोके घेऊन निघून गेला होता. अॅशलंड येथून निघालेला हा ट्रक तब्बल दोनशे मैलांचा प्रवास करून हम्बोल्ट काउंटीमधील ‘सॉर्टिंग फॅसिलिटी’ मध्ये आला असता, येथे काम करणाऱ्या एका कामगाराला बुटांच्या खोक्यामध्ये असणाऱ्या तेवीस हजार डॉलर्स किंमतीच्या नोटा आढळल्या. तितक्या वेळामध्ये आपण कचऱ्यामध्ये टाकलेले खोके कुठवर पोहोचले असावे याचा अंदाज त्या मनुष्याला आल्याने त्याने हम्बोल्ट काउंटीमधील सॉर्टींग फॅसिलिटी मध्ये फोन करून घडल्या प्रकारची सविस्तर हकीकत येथील व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना कथन केली होती.

तेवीस हजार डॉलर्स किंमतीच्या नोटा असलेले खोके कर्मचाऱ्याला सापडले आहे आहे हे समजताच व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी त्याबद्दलची सूचना सत्वर त्या मनुष्याला दिली. त्यानंतर पैश्यांनी भरलेले हे खोके परत मिळविण्यासाठी या मनुष्याने तब्बल पाच तासांचा प्रवास करीत हम्बोल्ट काउंटीमधील सोर्टींग फॅसिलिटी गाठली. तेथील अधिकाऱ्यांनी हे खोके त्याचेच असल्याची खात्री करून घेतली आणि पैश्यांनी भरलेले त्याचे खोके त्याला परत केले.

Leave a Comment