संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांचा कलम ३७० प्रकरणी बोलण्यास नकार


न्युयॉर्क – केंद्रातील मोदी सरकारने मंगळवारी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने याविरोधात संयुक्त राष्ट्राला पत्र लिहले आहे. पण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षा जोआना व्रोनचेका यांनी या पत्रावर बोलण्यास नकार दिला आहे.त्यांना एका पत्रकाराने न्युयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्ताने लिहलेल्या पत्राबद्दल विचारले असताना व्रोनचेका यांनी याबाबत बोलणार नसल्याचे सांगितले.

पाकिस्तानचा जम्मू काश्मीर राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतल्यानंतर जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानच्या बाजूने कोणत्याही देशाने मत नोंदवले नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्र खाते आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत घेण्याचे प्रयत्न करत आहेत. पण, कोणताही देश त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत नाही.

संयुक्त राष्ट्र संघटनेचे सचिव एंटोनियो गुटेरेस यांना पाकिस्तानचे परारष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्र लिहले आहे. पाकिस्तानने पत्रात काश्मीरबाबत भारताचा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. याप्रश्नी भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगण्याचे आवाहन गुटेरेस यांनी केले आहे. भारत पाकिस्तानमध्ये १९७२ साली झालेल्या शिमला कराराचाही उल्लेख गुटेरस यांनी केला. काश्मीर प्रश्न शांततेत सोडवावा, असे शिमला करारात असल्याचे ते म्हणाले.

भारताने जम्मू-काश्मीरविषयी घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तान बेचैन झाला आहे. एकामागोमाग एक भारतविरोधी निर्णय पाककडून घेतले जात आहेत. पाकमध्ये भारतीय चित्रपटांवरही बंदी आणली आहे. पण, भारतीय संविधानानुसार, हा भारताचा अंतर्गत विषय होता आणि पुढेही राहील. भारताशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांविषयी चिंताजनक चित्र तयार करून आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचा पाकचा कावा कधीही यशस्वी ठरणार नाही,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकला ठणकावून सांगितले आहे.

Leave a Comment