कराडमध्ये पूर परिस्थिती केवळ अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादामुळे


सातारा – पृथ्वीराज चव्हाण आघाडी शासनाच्या काळात मुख्यमंत्री असताना कराड येथील संरक्षक भिंतीचे मंजूर झालेले काम तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वादामुळे रखडले. संरक्षक भिंतीचे काम त्याच वेळी पूर्ण झाले असते, तर आज जी काही पूर परिस्थिती कराड शहरात उद्भवली आहे ती उद्भवली नसती, असा गौप्यस्फोट कराड येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी कराड येथे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी येणार होते. पण, हॅलिकॉप्टरमधूनच मुख्यमंत्र्यांनी कराड परिसरातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. दरम्यान, पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पुराच्या चौथ्या दिवशी कराड येथे भेट देत पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

शिवतारे यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, पाटण कॉलनी येथे हे पूरस्थितीची पाहणी केली. त्यावेळी कोयना नदीचा कराड येथील पैलतीर उंचावर असून कराड शहराकडील भाग सकल आहे. पूर संरक्षक भिंत याठिकाणी असती, तर शहरात पुराचे पाणी आले नसते. पृथ्वीराज चव्हाण आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना संरक्षक भिंतीसाठी तरतूद करण्यात आली होती. यातील काही काम पूर्णही झाले आहे. उर्वरित कामात काँक्रेटची भिंत बांधावी, असा मुद्दा पुढे आला.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात यावेळी झालेल्या मतभेदामुळे या भिंतीचे काम रखडले. कराड शहराला पुराचा मोठा तडाका भिंतीचे काम पूर्ण न झाल्यामुळेच बसला आहे, असा आरोप शिवतारे यांनी केला. संरक्षक भिंतीच्या कामाची प्रक्रिया येत्या 2 दिवसात हाती घेऊन तत्काळ संरक्षण भिंतीचे काम मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment