‘स्वीगी’ झाले पाच वर्षांचे !


भारतातील जवळपास सर्वच शहरांमध्ये अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या ‘स्वीगी’ या ‘फूड ऑर्डरिंग अँड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म’ला कार्यरत होऊन नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स सुरु केले गेले असले, तरी स्वीगीने मात्र आपली लोकप्रियता कायम राखली आहे. या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे चित्र ‘शेअर’ करण्याच्या उद्देशाने स्वीगीने अलीकडेच काही रोचक तथ्ये प्रसिद्ध केली आहेत. स्वीगीच्या अनुसार बेंगळूरू शहरातील एक ग्राहक स्वीगीचा सर्वात मोठा चाहता ठरला असून, आजतागायत स्वीगीमार्फत त्याने तब्बल १७,९६२ वेळा खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स दिल्या असल्याचे समजते. तसेच ‘ट्रफल्स’ नामक बेंगळूरू येथे असणारे रेस्टॉरंट, स्वीगी मार्फत, एका दिवसात सर्वाधिक ऑर्डर्स मिळविणारे रेस्टॉरंट ठरले आहे. त्याचप्रमाणे एका ग्राहकाने स्वीगीमार्फत तब्बल ७६,५२७ रुपये किंमतीचे आईसक्रीम मागवले असल्याने हा ग्राहक अर्थातच स्वीगीचा सर्वाधिक महागडी ऑर्डर देणारा ग्राहक ठरला आहे.

‘बिर्याणी’ हा पदार्थ केवळ हैदराबाद किंवा लखनऊ सारख्या शहरांची खासियत असला, तरी हा चविष्ट पदार्थ सर्व भारतातच अतिशय लोकप्रिय आहे. स्वीगीने देखील ही बाब मान्य केली असून, दररोज सर्वाधिक मागविल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी बिर्याणी अव्वल क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण देशभरात दर मिनिटामागे बिर्याणीच्या तब्बल ४३ ऑर्डर्स स्वीगीला मिळत असल्याचे समजते. बिर्याणी पाठोपाठ डोसा आणि त्यापाठोपाठ बर्गर्ससाठी सर्वाधिक ऑर्डर्स येत असल्याचे स्वीगी म्हणते. मिठाईच्या बाबतीत बोलायचे झाले तर सर्वाधिक ऑर्डर्स गुलाबजामासाठी असून या पाठोपाठ रसमलाईची मागणी सर्वाधिक असल्याचे स्वीगी म्हणते. पेयांमध्ये कॉफीला सर्वाधिक मागणी असल्याचे स्वीगी म्हणते.

फास्ट फूडच्या बाबतीत बोलायचे झाले तर गेल्या पाच वर्षांमध्ये स्वीगी मार्फत मॅकडोनाल्डस, डॉमिनोज्, सबवे आणि बर्गर किंग यांना सर्वाधिक ऑर्डर्स मिळाल्या आहेत, आणि हे सर्व पदार्थ बहुतेकवेळी रात्रीच्या भोजनासाठी मागविले जात असल्याचे स्वीगी म्हणते. गेल्यापाच वर्षांच्या काळामध्ये स्वीगीने आपला कारभार २९० पेक्षाही जास्त शहरांमध्ये वाढविला आहे. स्वीगी सोबत सध्या दोन लाखांहूनही अधिक ‘डिलिव्हरी पार्टनर्स’ संलग्न असून, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुरूग्राम येथे ‘स्वीगी स्टोअर्स’ ही सुरु केली गेली आहेत. या स्टोअर्समध्ये ताज्या भाज्या, फळे, किराणामाल, आणि इतर आवश्यक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये ‘स्वीगी डेली’ या उपक्रमालाही सुरुवात खाली असून, या द्वारे ग्राहकांसाठी ताजे घरगुती अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Leave a Comment