जुने ते सोने – आजीबाईच्या बटव्यावरच शास्त्रज्ञांना भरवसा


आजीबाईचा बटवा नावाची एक अनोखी संकल्पना आपल्याकडे होती. आजीबाईचा बटवा म्हणजे दररोजच्या जीवनातील अनेक आजारांवर घरगुती उपाय असायचे. या बटव्यात घरगुती मसाल्याचे पदार्थ जसे, खोकल्यावर आलं हे पदार्थ असायचे आणि त्यातूनच अनेक उपाय केले जात. आपली ऋषी-मुनींची परंपरा, शेतकरी, आपले शास्त्रज्ञ, आपला योगाभ्यास, आपला आयुर्वेद या सर्वांच्या सामर्थ्याची चेष्टा केली गेली, ते कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला आणि इथपर्यंत की या शक्तीबाबत आपल्याच जनतेमधील आस्था कमी करण्याचा प्रयत्न देखील झाला. एक प्रकारे आपल्याच वारशाकडे दुर्लक्ष करण्यात आले.

जी गोष्ट आजीबाईच्या बटव्याची तीच आभाळाकडे पाहून किंवा एखाद्या पक्षाच्या घरट्यावरून आणि झाडांची वाढ पाहून हवामानाचा अंदाज वर्तविण्याची. आपल्याकडे अनेक बुजुर्ग मंडळी अशा ज्ञानाच पारंगत असायची आणि आजही आहेत. मात्र त्यांच्या या ज्ञानाची आतापर्यंत थट्टा झाली आणि कुठल्या तरी बुरसटलेल्या जमान्यातील या गोष्टी असल्याचे मानले जात होते. सध्याच्या विज्ञानयुगाशी विसंगत अशा या गोष्टी असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता खुद्द शास्त्रज्ञांनीच या ज्ञानाला आदर दाखवायला सुरूवात केली आहे. विशेषतः हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी त्यांच्या या ज्ञानाचा वापर शास्त्रज्ञ करणार आहेत.

हवामान बदल आणि वाढत्या लोकसंख्येमुळे लाखो लोकांचे आयुष्य संकटात आले आहे. आपल्या महाराष्ट्रातही सध्याच्या पूर परिस्थितीतून याची प्रचिती येते. या हवामान बदलाचा अंदाज लावणेही शास्त्रज्ञांना कठीण झाले आहे आणि म्हणूनच, हे बदल समजून घेण्यासाठी पारंपरिक ज्ञान उपयोगी पडेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यासाठी वृक्ष-वेली, पक्षी किंवा तापमान यांच्या संकेतांकडे पाहावे लागेल. त्याद्वारे शहरांमध्ये राहणाऱ्या हवामानाच्या टोकाच्या परिस्थितीबद्दल पूर्वसूचना देणे शक्य होईल.

शहरांतील लोक अशा अंदाजांवर विश्वास ठेवत नाहीत. मात्र ब्रिटिश अॅकॅडमीच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधन अहवालात त्याला छेद देण्यात आला आहे. या संशोधनासाठी घाना या आफ्रिकी देशातील 21 ग्रामीण व शहरी भागांमध्ये राहणाऱ्या 1050 लोकांशी संवाद साधण्यात आला. यात राजधानी आक्रा आणि तामाल या उत्तरेतील मुख्य शहरांचाही समावेश आहे.

महापूर, दुष्काळ किंवा तपमानातील बदलांचा अंदाज घेण्यासाठी ज्या नैसर्गिक संकेतांचा वापर देशी समुदाय करत असत, अशा संकेतांची यादीच या संशोधकांनी तयार केली आहे. यात पावसाचे स्वरूप, मुंग्यांची वर्तणूक, काही चिमण्यांचे दिसणे किंवा गोरखचिंच झाडावर फूले उगवणे किंवा उष्णतेची तीव्रता यांचा समावेश आहे. आतापर्यंत हे संकेत आणि त्यांचा अर्थ यांची माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात येत असे.

“देशी ज्ञानाकडे साधारणतः दुर्लक्ष करण्यात येते. खेडे आणि शहरांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान होऊ शकते आणि यामुळे संपूर्ण जगातील लोकांचे जीवन व उपजीविका वाचवता येऊ शकते,” असे ब्रिटिश अॅकॅडमीच्या शहर व मूलभूत सोईसुविधा कार्यक्रमाच्या संचालक कॅरोलिन नोल्स यांचे म्हणणे आहे. काही ग्रामीण संकेत शहरांपर्यंत पोचवता येत नाहीत मात्र काही संकेत हे दोन्ही ठिकाणच्या वातावरणासाठी उपयुक्त आहेत, असे नोल्स यांचे म्हणणे आहे.

सन 2050 पर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त व्यक्ती मोठ्या प्रमाणातील पावसामुळे पुराच्या धोक्याचा सामना करतील कारण हवामानातील बदलांमुळे अनपेक्षित हवामानाचे धोके वाढत आहेत. हवामानातील बदलांना कारणीभूत ठरणारे कार्बन उत्सर्जन थांबवले नाही तर पुरासोबतच पाण्याची टंचाई आणि प्रचंड उष्णता आणि वीजटंचाई यांचेही प्रमाण वाढेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

येत्या काळात महापूर येणे अधिकाधिक अचानक होत जाईल आणि त्याचा आधीपासून अंदाज लावणे कठीण होईल. त्यामुळे विज्ञानावर आधारित इशारा देण्याच्या तंत्रात देशी ज्ञानाचा समावेश करावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. देशी समुदाय आणि हवामानाच्या संशोधकांमध्ये अधिकाधिक संवाद व्हायला हवा, असे मत नोल्स यांनी व्यक्त केले आहे.

आपल्याकडे पक्ष्यांच्या गमन-आगमनावरून बांधले जाणारे अंदाज हे 100 टक्के खरे ठरल्याचा अनुभव आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळात हवामान खातेही कोळ्यांना विचारूनच अंदाज बांधत होते. पारंपरिक आडाख्यांवरून बांधला जाणारा मान्सूनचा अंदाज अधिक खरा ठरतो, असे आढळते. या पारंपरिक आडाख्यांना कसलाही ज्ञात शास्त्रीय आधार नाही, पण विज्ञानापेक्षा हे अंदाज भरवशाचे असतात हे नक्की! हेच सत्य या संशोधनाने अधोरेखित केले आहे. त्यामुळे आधुनिक विज्ञानालाही आजीबाईच्या बटव्याकडे वळावे लागेल, यात शंका नाही.

Leave a Comment