काश्मिऱ्यांचा उर्मटपणा, धोनीला पाहून ‘आफ्रिदी’च्या नावाच्या घोषणा


काश्मीर – वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत जवानांसोबत सीमेवर वेळ घालवणे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पसंत केले आहे. भारतीय लष्करासह धोनी सध्या काश्मीरच्या खोऱ्यात पहारा देत असून धोनीला यावेळी एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. बारामुल्ला येथे पोहोचलेल्या धोनीला पाहून तेथे जमलेल्या जमावाने, पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदीच्या नावे ‘बूम बूम आफ्रिदी’ अशा घोषणा दिल्या. पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले असून सोशल मीडियावर या वृत्ताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


धोनीला पाहण्यासाठी काश्मीर खोऱ्यामध्ये राहणारे नागरिक मोठ्या संख्येने आले होते. तिथे भारतीय लष्करासह धोनी पोहोचला. काही हुल्लड नागरिकांनी तेव्हा धोनीला पाहून बूम बूम आफ्रिदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने आपल्या नेहमीच्याच शांत स्वभावानुरूप संयम बाळगत स्मित हास्य केले.

भारतीय जवानांसोबत बारामुल्ला येथे महेंद्रसिंह धोनी पोहोचला होता. बूम बूम आफ्रिदीच्या घोषणा तेव्हा तिथे जमलेले काही नागरिक देताना दिसत आहेत. पाकिस्तानी वृत्तवाहिनीने यावर काश्मीरी नागरिकांचे ह्रदय पाकिस्तानसाठीच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटरसाठीही धडकते, असे म्हटले आहे. धोनी १०६ टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) आहे. तो ३१ जुलै पासून बटालियनच्या जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत आहे.

Leave a Comment