‘हुर्रियत’च्या ‘या’ नेत्याला काश्मीरमध्ये अराजकता माजवण्यासाठी मिळायचे लाखो रुपये


नवी दिल्ली: सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आल्यामुळे तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधीलच एका फुटीरतावादी नेत्याने चौकशीदरम्यान काश्मीरमध्ये अराजकता माजवण्यासाठी स्थानिक पक्ष असणाऱ्या ‘हुर्रियत’चे प्रमुख नेते सय्यद अली गिलानी यांना लाखो रुपये मिळत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला.

या संदर्भातील वृत्त ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुप्तपणे सय्यद अली गिलानी यांना निधी पुरवला जात असे. त्यांना दर महिन्याला सहा ते आठ लाख रुपये मिळायचे. या निधीचे सर्व पुरावे गिलानी यांनी नष्ट केल्याचेही या फुटीरतावादी नेत्याने सांगितले.

सध्या या नेत्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. यावेळी त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना गिलानी यांच्याविषयी माहिती दिली. गिलानी यांच्या तहरिक-ए-हुर्रियत पक्षाकडून निधी उभारला जातो.

सहा ते आठ लाखांच्या देणग्या या निधीसाठी अनेक गुप्त व्यक्तींकडून येतात. याबद्दल बहुतांश लोकांना माहिती नाही. पण काश्मीरमधील व्यापारी जहूर वटाली याचा यामध्ये मोठा वाटा असल्याचेही संबंधित फुटिरतावादी नेत्याने सांगितले. तहरिक-ए-हुर्रियत आपल्या वृत्तपत्रात देणगीसाठी रमजानच्या महिन्यात जाहिराती देत असे. अनेक व्यापारी आणि पदाधिकारी या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाला देणगी देत असत. यापैकी ६० टक्के निधी जिल्हाध्यक्षांकडे जात असे तर ४० टक्के निधी गिलानी यांना मिळायचा, असेही या नेत्याने सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या माहितीच्याआधारेच वटाली आणि जम्मू-काश्मीर बँकेविरोधात कारवाई केली होती. तसेच वटाली याच्यासह अनेक फुटीरतावादी नेत्यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. मात्र, यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वटालीला जामीन मंजूर केला होता.

Leave a Comment