असे होते सुप्रसिद्ध गायक, अभिनेता किशोर कुमार यांचे खासगी आयुष्य.


आपल्या सुरेल गीतांनी आणि उत्कृष्ट अभिनयाने एके काळी सर्वच देशवासियांना मोहून टाकणाऱ्या किशोरदांचा जन्मदिन नुकताच, चार ऑगस्ट रोजी होऊन गेला. आज जरी किशोरदा हयात नसले, तरी त्यांच्या आवाजातील मधुर गीते आजही संगीतप्रेमींच्या आठवणींत ताजी आहेत. अभिनय आणि संगीतामुळे किशोरदा ज्याप्रमाणे सतत लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असत, तितकेच त्यांचे खासगी आयुष्यही वारंवार चर्चेचा विषय ठरत आले. किशोरदा यांनी चार वेळा विवाह केले असल्याने त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींबद्दल लोकांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे.

१९५१ साली किशोरदांनी अभिनेत्री रूमा गुहा यांच्याशी विवाह केला. त्या वेळी किशोरदांची बॉलीवूडमध्ये म्हणावी तितकी ओळख निर्माण झालेली नव्हती. मात्र ही विवाहसंबंध फार काळ टिकू शकले नाहीत. अवघ्या सातच वर्षांमध्ये, १९५८ साली किशोरदा आणि रूम यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर रूमा यांनी घरामध्ये राहून घरच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे किशोरदांना वात असे, तर रूमाही व्यवसायाने अभिनेत्री असल्यामुळे त्यांना अभिनयक्षेत्रामध्ये आपली कारकीर्द करण्याची इच्छा होती. याच कारणांस्तव मतभेद होऊन दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रूमा गुहा यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर किशोरदांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्याशी विवाह केला. त्यावेळी मधुबाला आपल्या यशस्वी कारकीर्दीच्या शिखरावर होत्या. त्यांचे असंख्य चाहतेही होते. प्रत्येक अभिनेत्याला मधुबालासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे साहजिकच मधुबाला यांचे नाव अनेकदा अनेक अभिनेत्यांशी जोडले जात असे. पण तरीही किशोरकुमार यांच्या व्यक्तिमत्वाची छाप मधुबाला यांच्यावर पडली आणि दोघे विवाहबद्ध झाले. मात्र मधुबाला यांच्या परिवाराने या विवाह संबंधाचा स्वीकार कधीच केला नाही. पण हे विवाहसंबंधही फार काळ टिकू शकले नाहीत, आणि त्यानंतर लवकरच मधुभाला यांचे हृदयाशी निगडित समस्येमुळे निधन झाले, आणि किशोरदा आयुष्यामध्ये पुन्हा एकदा एकटे पडले.

मधुबाला यांच्या निधानानंतर किशोरदांच्या आयुष्यामध्ये आल्या अभिनेत्री योगिता बाली. एकेमेकांशी असलेल्या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले, आणि १९७६ साली या दोघांनी विवाह केला. हे विवाहसंबंध केवळ दोन वर्षेच टिकले. १९७८ साली योगिता बाली आणि किशोरदा यांचा घटस्फोट झाला, आणि त्यानंतर योगिता बाली यांनी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याशी विवाह केला. योगिता बाली यांच्याशी असलेले संबंध संपुष्टात आल्यानंतर किशोरदांच्या आयुष्यामध्ये अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी प्रवेश केला. १९८० साली किशोरदांनी लीनाशी विवाह केला. त्यांना एक मुलगा ही झाला. लीना आणि किशोरदा यांच्या वयामध्ये तब्बल एकवीस वर्षांचा फरक असल्याने हे विवाहसंबंध किशोरदांच्या परिवाराला अजिबात मान्य नव्हते.

Leave a Comment