विक्रमवीर सुषमा स्वराज


माजी परराष्ट्रमंत्री आणि देशातील ज्येष्ठ महिला नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत महिला राजकारणी म्हणून सुषमा स्वराज यांनी अनेक विक्रम रचले. पहिलेपणाचे अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले.

सुषमा यांनी 1970च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी नेते जॉर्ज फ़र्नांडिस यांचे निकटचे सहकारी होते. त्यामुळे त्याही 1975 मध्ये फर्नांडिस यांच्यासोबत काम करू लागल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात हिरीरीने भाग घेतला. आणीबाणी संपल्यावर त्या जनता पक्षाच्या सदस्य बनल्या. त्याच दरम्यान त्यांनी 1977 मध्ये अंबाला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि चौधरी देवीलाल यांच्या सरकारमध्ये त्या मंत्री बनल्या. वयाच्या केवळ 25 व्या वर्षी कॅबिनेट मंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला. या सरकारमध्ये त्यांनी 1977 ते 79 पर्यंत श्रममंत्री म्हणून काम केले. वयाच्या 27व्या वर्षी त्या 1979 मध्ये हरियाणा राज्य जनता पक्षाच्या अध्यक्ष बनल्या.

भाजपची स्थापना झाल्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या. त्यानंतर 1987 पासून 1990 पर्यंत अंबाला मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून येत राहिल्या. भाजप-लोकदल संयुक्त सरकारात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केले. एप्रिल 1990 मध्ये त्यांची निवड राज्यसभेवर झाली आणि तेथे त्या 1996 पर्यंत होत्या. त्याच वर्षी त्यांनी दक्षिण दिल्लीतून निवडणूक जिंकली आणि स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसांच्या सरकारात माहिती व प्रसारण मंत्री झाल्या. पुन्हा मार्च 1998 मध्ये त्या याच मतदारसंघातून निवडून आल्या. यावेळी वाजपेयी सरकारमध्ये माहिती व प्रसारण खात्यांसोबतच त्यांच्याकडे दूरसंचार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या12 ऑक्टोबर 1998 पर्यंत या पदावर होत्या. त्यांच्याच काळात चित्रपट उद्योगाला उद्योगाचा दर्जा देण्यात आला.

केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्या 12 ऑक्टोबर 1998 रोजी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. मात्र दोनच महिन्यात त्यांनी विधानसभेचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रीय राजकारणात पदार्पण केले. सप्टेंबर 1999 मध्ये त्यांनी कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. सप्टेंबर 2000 ते मे 2004 पर्यंत त्या पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात होत्या.

सुषमा स्वराज यांची 2009 मध्ये संसदेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली होती. म्हणजेच 15व्या लोकसभेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. त्या 2009 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षही होत्या. या समितीत 19 सदस्य होते. मे 2014 मध्ये भाजपचा विजय होईपर्यंत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. लोकसभा किंवा राज्यसभेत विरोधकांना उत्तर देण्याची त्यांची हातोटी इतकी विलक्षण होती, की त्यांना संसदेची वाघीण असे म्हटले जायचे.

भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री होण्याचा मान स्वराज यांना लाभला आहे. भाजपात राष्ट्रीय मंत्री होणारी पहिली महिला होण्याचा मानही त्यांच्या नावावर जमा आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता होणाऱ्या त्या पहिली महिला होत्या. कॅबिनेट मंत्री होणाऱ्याही त्या भाजपच्या पहिली महिला आहेत. दिल्लीच्या पहिली महिला मुख्यमंत्री आणि संसदेत सर्वश्रेष्ठ खासदाराचा पुरस्कार जिंकणाऱ्याही त्या पहिली महिला होत्या.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या प्रमुख विरोधक गणल्या जात होत्या. मोदी यांच्या विरोधातील लालकृष्ण अडवाणी गटात त्या असल्याचे मानले जात होते. मात्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्याकडे परराष्ट्रमंत्री हे पद दिले. ते त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळले. ट्विटरवरून संवाद साधत परदेशी असलेल्या भारतीयांना मदत करण्याची खास शैली त्यांनी विकसित केली होती. राजकारणात त्यांनी आपल्या तत्त्वांना नेहमीच प्राधान्य दिले. एक श्रेष्ठ विधिज्ञ , साहित्यप्रेमी, प्रभावी वक्त्या, अभिजात रसिक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण वैशिष्ट्ये होती. अस्खलित संस्कृत बोलू शकणाऱ्या मोजक्या राजकारण्यांमध्ये त्यांची गणना होती. स्वराज यांच्या निधनाने एका विक्रमवीर आणि कर्तृत्वशाली नेत्याचा अस्त झाला आहे.

Leave a Comment