वाहन उदयोग जात्यात, वस्त्रोद्योग सुपात


वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे वाहन डीलरांनी आपापली दुकाने बंद करण्यास सुरूवात केली आहे. अशा आशयाच्या बातम्या गेल्या-तीन दिवसांपासून विविध माध्यमांतून पुढे येत आहेत. मात्र देशात संकटात असलेला केवळ वाहन उद्योगच नाही तर वस्त्रोद्योग उद्योगही त्याच मार्गावर असल्याचे संकेत या उद्योगातील जाणकारांनी दिले आहेत.

गेल्या तीन महिन्यांत वाहन डीलरांनी बंद केलेल्या शोरूममधून दोन लाख लोकांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. म्हणजेच दोन लाख लोकांचा रोजगार गेला आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) या संघटनेने जाहीर केली आहे. येत्या काळातही या स्थितीत काही फरक पडण्याची शक्यता नाही त्यामुळे वाहन शोरूम बंद होण्याची मालिका सुरूच राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात देशातील 271 शहरांतील 286 शोरूम बंद झाले आहेत. यात 32 लाख जणांना नोकरी गमवावी लागली होती. दोन लाख रोजगार जे गेले ते वेगळेच, असे ‘फाडा’चे अध्यक्ष आशीष काळे यांनी म्हटले आहे.

विक्री घटल्यामुळे वितरकांकडे मनुष्यबळ कमी करण्याशिवाय अन्य पर्यायच राहिलेला नाही. कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची ही मालिका मे महिन्यात सुरू झाली होती आणि जून व जुलै महिन्यात ती चालू राहिली. यातील बहुतेक कर्मचारी हे विक्री विभागातील होते. वाहनविक्रीतील ही घट अशीच कायम राहिली तर विक्री विभागासोबतच तांत्रिक विभागातील कर्मचारी कपातही करावी लागेल, असे काळे यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात सरकारने उद्योगाला मदतीसाठी हात द्यावा आणि वस्तू व सेवाकरात (जीएसटी) सवलत द्यावी, अशी ‘फाडा’ची मागणी आहे. देशात सध्या सुमारे 15 हजार वितरकांचे 26 हजार शोरूम आहेत. यात सुमारे 25 लाख जणांना थेट रोजगार मिळतो तर 25 लाख जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. याचाच अर्थ वाहन शोरूममधून देशातील सुमारे 50 लाख जणांना रोजगार मिळतो. वाहन उत्पादकांच्या ‘सियाम’ या संघटनेच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या काळात सर्व श्रेणींच्या वाहनांची विक्री 12.35 टक्क्यांनी कमी झाली.

दुसरीकडे देशात सर्वाधिक रोजगार पुरविणाऱ्या कापड (वस्त्रोद्योग) उद्योगालाही मंदीचा सामना करावा लागत आहे. शेतीनंतरचे सर्वाधिक मोठे क्षेत्र अशी वस्त्रोद्योगाची ओळख आहे. मात्र हा उद्योग गेली काही वर्षे विविध कारणांनी त्रस्त आहे. मंदावलेली निर्यात, प्रशासनातील निरुत्साह, दीर्घकाळ चाललेली मंदी आणि कामगारांचे प्रश्न यांमुळे या व्यवसायात मरगळ आली आहे.

गेल्या तीन महिन्यांत चीन, बांगलादेश आणि दक्षिण कोरिया यांसारख्या आयातदार देशांमधून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कापसाच्या धाग्याच्या निर्यातीत सातत्याने घसरण झाली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे वस्त्रोद्योगातील जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला चीनने शुल्कमुक्त प्रवेश दिल्यामुळे या चिंतेत भरच पडली आहे.

जून महिन्यात कापसाच्या धाग्याची निर्यात गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक कमी झाली. गेल्या वर्षी ही निर्यात 120 दशलक्ष किलो होती ती 59 दशलक्ष किलोंवर आली. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात कमी मासिक निर्यात होती. एकूणच जूनमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कापसाच्या धाग्याची निर्यात 33 टक्क्यांनी घसरून ती 226 दशलक्ष किलोंवर आली.

सुती धाग्याचे क्षेत्र हे भारतीय कापड उद्योगातील एक आधारस्तंभ आहे आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण झालेले आहे. त्यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नही मिळते. त्यामुळेच स्पिनिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक उद्योजकांनी केली आहे मात्र देशांतर्गत बाजारपेठेत कापसाला कमी मागणी आहे. त्यामुळे निर्यात हा एकमेव मार्ग आहे. निर्यातीतील ही घसरण पुढच्या तिमाहीत थांबली नाही तर नजीकच्या काळात अनेक सूतकताई कारखाने बंद पडतील आणि परिणामी कामगार कपात करावी लागेल, असे टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष के. व्ही. श्रीनिवासन यांनी हिंदू बिझिनेसलाईन वृत्तपत्राला सांगितले.

थोडक्यात म्हणजे वाहन उदयोगातील मंदी ही आता दिसत असली तरी वस्त्रोद्योगातही हेच चित्र नजीकच्या काळात येण्याची शक्यता आहे. वाहन उदयोग जात्यात आहे तर वस्त्रोद्योग सुपात, इतकाच काय तो फरक!

Leave a Comment