गोंधळलेल्या कुमारस्वामींचे वैफल्यग्रस्त चिंतन


कर्नाटकातील सत्ता गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काही धडे घेतल्याचे दिसत आहे. पदावर असताना जे कुमारस्वामी डबडबल्या डोळ्यांनी आणि दाटून आलेल्या गळ्याने बोलत असत ते आता मोकळेपणाने बोलू लागले आहेत. मात्र आजही ते भविष्यात काय करायचे याबाबत गोंधळात असल्याचे वाटत आहे. म्हणूनच राजकारणातून संन्यास घेण्यापासून काँग्रेसशी युती तोडण्यापर्यंत त्यांनी सर्व प्रकारची वक्तव्ये केली आहेत.

शनिवारी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना कुमारस्वामी यांनी राजकीय वैराग्य आल्याचे संकेत देऊन थेट निवृत्तीची भाषा केली. “मी चुकून राजकारणात आलो आहे. मी चुकून मुख्यमंत्री झालो. देवाने मला दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी कुणालाही समाधानी करण्यासाठी आले नव्हतो. मी राज्याच्या विकासासाठी 14 महिने चांगले काम केले,” असे त्यांनी सांगितले. मी राजकारणापासून दूर जाण्याचा विचार करतो आहे, असे स्पष्टपणे सांगून त्यांनी राजकीय निवृत्तीची भाषा केली. सध्याचे प्रचलित राजकारण लोकांसाठी चांगले नसल्याचे सांगून त्यात जातीयवादावर जोर देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

“आजचे राजकारण कुठे चालले आहे हे मी पाहत आहे. ते चांगल्या लोकांसाठी नाही, ते जातीयवादी आहे. यात माझ्या कुटुंबाला आणू नका. मला शांततेत जगू द्या. मला राजकारणात पुढे जाण्याची गरज नाही. मला लोकांच्या हृदयात जागा हवी आहे,” असे कुमारस्वामी म्हणाले.

याच बैठकीत बोलताना त्यांनी नव्या निवडणुकांसाठी तयार राहायला सांगितले. ही निवडणूक खूप लवकर होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेशकुमार यांनी 17 आमदारांना अपात्र ठरविल्यामुळे त्यांच्या मतदारसंघांत पोटनिवडणुका होऊ शकतात किंवा राज्य विधानसभेच्या सर्व 224 जागांवरही होऊ शकतात. अशा प्रकारच्या दोन्ही निवडणुकांसाठी कुमारस्वामींनी हा तयारीचा सल्ला दिला आहे. मात्र सध्याचे बी. एस. येडियुरप्पा यांचे सरकार फार काळ चालणार नाही, असे त्यांनी बोलून दाखवले.

कुमारस्वामी यांची वैफल्याची भाषा समजण्यासारखी आहे. काँग्रेस -धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) संयुक्त सरकार त्यांनी 14 महिने चालवून दाखवले. या काळात त्यांना काँग्रेसकडून अनेक अपमान आणि अवहेलनांना सामोरे जावे लागले. पहिल्या दिवसापासूनच हे सरकार खिळखिळे करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते. अखेर दोन्ही पक्षांतील मिळून 16 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांना पायउतार व्हावे लागले. कदाचित त्याचे दुःख आजही त्यांना जाणवत असावे.

त्याच सोबत केवळ 6-7 जागांसाठी सत्तेला मुकलेल्या भाजपनेही त्यांच्या सरकारला घेरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना वैयक्तिक आणि त्यांच्या सरकारलाही घेरण्यात आले होते. दुसरीकडे गौडा कुटुंबातील वादामुळे पारिवारिक पातळीवर ते वैतागलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कधीही सुखाने राज्य करता आले नाही.

“माझ्या सरकारच्या बालमृत्यूची मला अपेक्षा होतीच कारण जेडीएस-काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून भाजप त्याला अस्थिर करण्यामागे लागले होते,” असे ते म्हणाले. त्याचसोबत काँग्रेसमधील अंतर्गत यादवीसुद्धा आपल्या सरकारच्या पतनासाठी जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

त्याचमुळे यापुढे काँग्रेसशी युती न करता राज्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. “आता कोणतीही युती होणार नाही. आम्हाला आता युतीची गरज नाही. मला सत्तेची गरज नाही, मला तुमच्या प्रेमाची गरज आहे,” असे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले.

आपली सगळी राजकीय गणिते चुकल्याची जाणीव झालेल्या व्यक्तीचे हे हतबल होऊन काढलेले उद्गार आहेत. तमिळनाडू, आंध्र, तेलंगाणा आणि केरळ या दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत. जेडीएस हा त्यांच्यातीलच एक. कुमारस्वामींचे पिताश्री व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे पक्षाचे संस्थापक. केंद्रात राजकीय संकट निर्माण झाले तेव्हा त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली होती.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती उद्भवली तेव्हा भाजपला रोखण्याच्या नावाखाली जेडीएसने काँग्रेसशी युती केली. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा त्रिशंकू स्थिती आली तर तिसऱ्या आघाडीतील मित्रपक्षांना सोबत घेऊन पंतप्रधान होण्याची स्वप्ने देवेगौडा पाहत होते. त्यासाठी जेडीएसने काँग्रेसचा सासुरवास 14 महिने सहन केला. ते स्वप्न अपूर्णच राहिले आणि या युतीतून काँग्रेसचा काहीच फायदा नसल्यामुळे तिलाही ती नकोच होती. अखेर ही युती तुटण्याची वेळ अखेर येऊन ठेपली. आता सरकारही गेले आणि युतीही गेली, मग हाती आलेल्या धुपाटण्यातून कुमारस्वामींना वैराग्य येणे स्वाभाविक आहे.

Leave a Comment