अमेरिकेच्या रक्तातच वर्णद्वेष!


अमेरिकेचा शोध लागल्यानंतर यूरोपमधील अनेक देशांतून लोकांची तिकडे जाण्याला रीघ लागली. त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि ते प्रदेश आपल्या राज्यांना जोडले. मात्र त्यांनी आपल्याबरोबर शेती व अन्य कामांसाठी निग्रोंना आपल्यासोबत नेले आणि त्यांना गुलाम केले. अशा प्रकारे आफ्रिका खंडात इ. स. 1652 पासून वसाहतीकरणाला सुरूवात झाली. त्यावेळेपासून वर्णविद्वेषाची प्रवृत्ती जवळपास सगळ्या गोऱ्या लोकांमध्ये कमी अधिक फरकाने दिसून येते.

काळ्या लोकांची संस्कृती हीन व अप्रगत आहे आणि आदिवासींची संस्कृती त्याहूनही खालची आहे, हा गोऱ्या लोकांचा लाडका समज आहे. साहजिकच काळ्या लोकांना कनिष्ठ मानव समजून त्यांना गोऱ्या लोकांच्या सुखसोयी नाकारण्यात आल्या. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, दक्षिण आफ्रिका खंड, दक्षिण ऱ्होडेशिया व ग्रेट ब्रिटन यांमध्ये निग्रोंना व काळ्या लोकांना हीन लेखण्यात येऊ लागले. त्यातूनच अमेरिकेत गुलामगिरीचा उदय झाला. भारतीयांचा समावेशही काळ्या लोकांमध्ये होत होता आणि म्हणूनच महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून उतरवण्यात आले.

या भेदभावाच्या विरोधात अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धानंतर वर्णद्वेषविरोधी चळवळ सुरू झाली. मार्टिन ल्यूथर किंग हे चळवळीतील अग्रणी नेते होते. किंग यांच्यावर म. गांधींच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. नागरी हक्क समानतेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. डिसेंबर 1955 मध्ये अमेरिकेत एका स्थानिक वाहतूक कंपनीच्या बसमधये कृष्णवंशियांना गोऱ्या लोकांच्या शेजारी बसू न देण्याच्या कारणावरून अमेरिकेत एक चळवळ सुरू झाली. या वर्णद्वेषी धोरणाविरुद्धच्या अहिंसात्मक चळवळीचे नेतेपण किंग यांच्याकडे आले. ती चळवळ यशस्वी झाली आणि गोऱ्यांच्या शेजारी बसण्याचा अधिकार कृष्णवंशियांना मिळाला.

तोपर्यंत अमेरिकेत कृष्णवंशियांना निग्रो म्हणून हिणवले जात होते. गोऱ्या लोकांचे अधिकार त्यांना नाकारण्यात येत होते. किंग यांच्या चळवळीमुळे त्याची तीव्रता कमी झाली तरी आजही हा वर्णद्वेष अमेरिकी लोकांच्या रक्तात आहे. सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वर्णद्वेषाचा आरोप त्याच देशातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र ट्रम्प यांच्यापूर्वीही अनेक अध्यक्षांनी व नेत्यांनी हा वर्णद्वेष दाखवला होता, याचे पुरावे वेळोवेळी समोर येतात.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी चक्क संयुक्त राष्ट्रसंघात आफ्रिकेच्या प्रतिनिधींना माकड म्हणून संबोधले होते, हा गौप्यस्फोट याच मालिकेतील एक उदाहरण होय. रोनाल्ड रेगन यांनी 1971 मध्ये तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याशी टेलिफोनवर बोलताना हे शब्द वापरले होते. रेगन हे त्यावेळी कॅलिफोर्निया प्रांताचे गव्हर्नर होते. चीनला मान्यता देण्याच्या आणि तैवानला राष्ट्रसंघातून बाहेर काढण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रसंघात मतदानाला आला होता. त्यावेळी टांझानियाच्या प्रतिनिधींनी अमेरिकेच्या विरोधात मतदान केले होते. त्यामुळे ते रागावले होते, असे बीबीसीने म्हटले आहे.

न्यूयॉर्क विद्यापीठाचे एक प्राध्यापक टिम नेफ्टाली यांनी काही जुन्या ध्वनिफीतींच्या आधारे हा गौप्यस्फोट केला असून ते 2007 ते 2011 पर्यंत निक्सन प्रेसिडेन्शियल लायब्ररीचे संचालक होते. “आफ्रिकेतून आलेली ही माकडे पाहा…त्यांना खड्ड्यात घाला…ते अजूनही नीट बूट घालू शकत नाहीत,” असे रेगन निक्सनशी बोलताना या ध्वनिफीतीत ऐकता येते. विशेष म्हणजे रेगन यांच्या या वक्तव्यावर निक्सन हसताना ऐकू येते.

ही टिप्पणी एवढी वर्णद्वेषी होती, की खुद्द रेगन यांच्या मुलीनेही त्यांचा बचाव करण्यास नकार दिला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात पॅटी डेव्हीस यां त्यामच्या मुलीने म्हटले आहे, की मी त्यांच्या बाजूने बोलण्याचे ठरवले होते मात्र ती ध्वनिफीत ऐकल्यानंतर मी माझा विचार बदलला. या शब्दांनी मला धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गंमत म्हणजे ज्या राष्ट्रसंघातील मतदानाबाबत रेगन यांनी हे शब्द वापरले त्याच संघटनेने मानवी हक्कांच्या घोषणापत्रकात वर्णविद्वेष, वंशभेद इत्यादींना नकार दिला आहे तसेच त्यांच्याविरुद्ध कायदाही केला आहे. जागतिक पातळीवरही आता वर्णद्वेष हा आता अक्षम्य गुन्हा मानला जातो. तरीही गोऱ्या लोकांमधील काही सुशिक्षित व प्रतिष्ठित पुढाऱ्यांची मानसिकता आजही वर्णद्वेषाची असल्याचे अशा घटना दाखवून देतात. त्यामुळे वर्णद्वेष अमेरिकेच्या रक्तातच आहे की काय, असे वाटायला लागते.

Leave a Comment