कथा गेली पंचेचाळीस वर्षे सातत्याने शिजत असलेल्या सूपची


वाईन जितकी जुनी तितकी जास्त चांगली ही मान्यता फार प्राचीन काळापासून रूढ आहे. हीच मान्यता बँकॉकमधील एका रेस्टॉरंटमध्ये शिजविल्या जाणाऱ्या सूपला लागू पडली असून, या रेस्टॉरंटमध्ये शिजविले जाणारे सूप जसजसे जुने होत चालले आहे, तसतसे अधिक चविष्ट होत चालले आहे. ‘वॉत्ताना पॅनिच’ नामक हे रेस्टॉरंट बँकॉकमध्ये असून, या रेस्टॉरंटमध्ये गेली पंचेचाळीस वर्षे सातत्याने सूप शिजविले जात असून, त्या दिवशी शिल्लक राहिलेल्या सूपमधेच इतर आवश्यक पदार्थांची भर घालून दुसऱ्या दिवशीसाठी सूप तयार केले जात असते. हे सूप शिजविले जात असलेल्या भल्या मोठ्या हंड्याखालचा विस्तव गेली पंचेचाळीस वर्षे असाच धगधगत आहे.

गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीमध्ये दिवसाच्या शेवटी एकदाही हे सूप कधी टाकून दिले गेले नाही. या सूपचा वापर नेहमी पुढल्या दिवशी बनविल्या जाणाऱ्या सूपसाठी केला जात असून, त्याचा जोडीने ताजे मांस, मीट बॉल्स, ट्राईप, आणि इतरही अनेक मांसाहारी पदार्थ व नूडल्स या सूपमध्ये घालून हे चविष्ट सूप तयार होत असते. या चविष्ट सूपला ‘न्युआ ट्युना’ म्हटले जात असून, हे सूप बँकॉकमध्ये प्रसिद्ध आहे.

हे सूप बनविण्याची पद्धत प्राचीन असून, हे रेस्टॉरंट चालविणारी पिढी मूळ मालकाची चौथी आणि पाचवी पिढी आहे. या सुपाचा महिमा केवळ बँकॉकमधेच नाही, तर जगभर पसरला असल्याने सोशल मिडीयावरही अनेकदा हे सूप खवय्ये मंडळींच्या चर्चेचा विषय ठरले आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सूप बनविण्याच्या पद्धतीमध्ये कोणताही फेरफार न करता हे सूप बनविले जात असल्याने या सूपची मूळची चव, पंचेचाळीस वर्षांपूर्वी होती तशीच उत्तम ठेवण्यात आजच्या पिढीलाही यश आले असल्याचे रेस्टॉरंटचे मालक म्हणतात.

Leave a Comment