कबुतरांशी दोस्ती करण्यासाठी या कलाकाराने बनवविले ‘पिजन शूज’


जेव्हा जपानी कलाकार केईको ओहाटाने कबुतरांशी दोस्ती करण्याचे ठरविले तेव्हा कबुतरांचा विश्वास नेमका कसा जिंकायचा याची अचूक युक्ती तिने शोधून काढली. कबुतरांशी दोस्ती करण्यासाठी तिने ‘पिजन शूज’ डिझाईन केले आहेत. हे शूज इतके हुबेहूब कबुतरांच्या सारखे दिसतात, की खुद्द कबुतरांचा देखील क्षणभर गोंधळ उडावा. हुबेहूब आपल्या प्रमाणेच दिसणाऱ्या या शूजरूपी कबुतरांना पाहून इतर कबुतरे न घाबरता आपल्या जवळ येतील आणि आपली त्यांच्याशी दोस्ती होईल अशी आशा केईकोला वाटते.

हे पिजन शूज बनविले जाण्याची संपूर्ण प्रक्रिया केईकोने ‘निफ्टी’ नामक वेबसाईटवर शेअर केली असून, या वेबसाईटवर आधीही केईकोने अनेक ‘do it yourself’ ( diy ) प्रकल्प नेटीझन्ससोबत शेअर केले आहेत. केईकोने अलीकडेच तयार केलेल्या पिजन शूजसाठी फेल्ट, स्टायरोफोम, आणि लोकरीचा वापर केला आहे. या सर्व वस्तूंनी कबुतर तयार करून केईकोने ते हायहिल शूजवर जोडले आहे. तसेच हे हायहिल शूज कबुतरांच्या पिसांप्रमाणे रंगविलेल्या लोकरीने झाकलेले आहेत. हे पिजन शूज खरोखरच कामी येतात की नाही याचे परीक्षणही केईकोने अलीकडेच एका उद्यानामध्ये करून पाहिले.

हे पिजन शूज परिधान करून केईको एका उद्यानामध्ये गेली असता, अनेक कबुतरे तिच्या पावलांच्या अगदी जवळून येत जात असून, अगदी तिच्या पावलांच्या लगत पडलेले दाणे टिपीत होती. केईकोने अनेकवेळा पावलांची थोडीफार हालचाल केल्यानंतरही इतर कबुतरे उडून न जाता तिच्या पावलांच्या नजीकच वावरत राहिली. केईकोला ज्याप्रमाणे कबुतरांशी दोस्ती करायची होती, ते उद्दिष्ट साधणे तिला अद्याप शक्य झाले नसले, तरी तिचे हे आगळे वेगळे पिजन शूज हटके ‘फॅशन ट्रेंड’ मात्र बनले आहेत.

Leave a Comment