अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असूनही पारंपारिक पद्धतींचे इस्रो, नासामध्ये पालन


तंत्र-मंत्र, पूजा-पाठ आणि तत्सम इतर धार्मिक कार्यांशी निगडीत पारंपारिक पद्धतींच्या पालनाच्या बाबतीत सामान्य जनता आग्रही समजली जात असली, तरी काही बाबतीत शकुन-अपशकुनाच्या, पूजापाठाशी निगडित मान्यता केवळ सामान्यजनांच्या बाबतीत मर्यादित न राहता इस्रो, नासा सारख्या तांत्रिक दृष्ट्या अतिप्रगत संस्थांमध्येही अगत्याने स्वीकारल्या जाताना पहावयास मिळतात. मग एखाद्या मिशनच्या यशासाठी देवतांचे पूजन असो, किंवा एखादी ठराविक, वर्षानुवर्षे चालत आलेली रीत असो, यांचे काटेकोर पालन नासा सारख्या अतिप्रगत संस्थांमध्ये देखील केले जात असते. या रीतींचे पालन करण्यामागे हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण व्हावे अशी भावना असते. भारत देशाच्या ‘चांद्रयान-२’ने काही काळापूर्वीच अंतराळात यशस्वी उड्डाण केले. पण हे यान आकाशामध्ये झेपावण्यापूर्वी इस्रोच्या वैज्ञानिकांनी हे मिशन यशस्वी रित्या पूर्ण होण्यासाठी धार्मिक अनुष्ठाने करून देवतांचे आशीर्वादही घेतले.

इस्रोच्या वतीने कुठल्याही मिशनच्या पूर्वी आंध्र प्रदेशातील तिरुमाला येथे भगवान श्री वेंकटेश मंदिरामध्ये विधिवत पूजन केले जात असते. इतकेच नव्हे, तर आकाशामध्ये पाठविणार असलेल्या यानाची एक लहानशी प्रतिकृतीदेखील भगवान वेंकटेशाच्या चरणी अर्पण करून मिशन यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जाते. इस्रोमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व मशीन्सवर शुभचिन्हे बनविली गेली असून, ज्या दिवशी नव्या मिशनअंतर्गत रॉकेट लॉन्च होणार असेल, त्यादिवशी इस्रोच्या निर्देशकांनी नवे कपडे परिधान करण्याची परंपरा देखील इस्रोमध्ये वर्षानुवर्षे पाळली जात आहे. केवळ भारतातील इस्रोच नव्हे, तर जगभरातील तमाम स्पेस एजन्सीज तेरा तारखेच्या दिवशी कोणतीही नवी मिशन हाती घेत नाहीत. चंद्रावर उतरण्यासाठी लॉन्च केलेली ‘अपोलो-१३’ ही मिशन विफल झाल्यानंतर इतर कोणत्याही मिशन साठी अमेरिकन स्पेस एजन्सीच्या वतीने तेरा क्रमांक पुन्हा कधीही वापरला गेला नसल्याचे म्हटले जाते. कदाचित याच कारणास्तव इस्रोने बनविलेल्या रॉकेट ‘पीएसएलव्ही सी-१२’ नंतर, तेरा क्रमांकाचा वापर टाळून त्यापुढे ‘पीएसएलव्ही सी-१४’ या यानाला आपल्या मिशनचे सारथी बनविले. याव्यतिरिक्त इस्रोमधून मंगळवारच्या दिवशीही कोणतेही मिशन लॉन्च होत नसे, पण ४५० कोटी रुपये खर्च करून तयार केले गेलेले ‘मार्स ऑर्बिटर’ आकाशामध्ये झेपावले तो दिवस मंगळवारचाच असल्याने वर्षानुवर्षे चालत आलेली जुनी परंपरा संपुष्टात आली आहे.

अमेरिकी स्पेस एजन्सी नासामध्येही काही अजब मान्यता रूढ आहेत. नासामधून केव्हा कोणतेही मिशन लॉन्च होणार असेल, तेव्हा ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’मधील वैज्ञानिकांनी शेंगदाणे खाण्याची पद्धत नासामध्ये रूढ आहे. या मान्यतेमागेही एक रोचक कथा आहे. प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांच्या अनुसार १९६० साली लॉन्च व्हायचे असलेले ‘रेंजर मिशन’ सहा वेळा विफल ठरले. सातव्या वेळी हे मिशन लॉन्च होत असताना लॅबमधील काही वैज्ञानिक शेंगदाणे खात होते, आणि त्यावेळी हे मिशन यशस्वी झाले. तेव्हापासून कोणत्याही मिशनपूर्वी येथे शेंगदाणे खाण्याची पद्धत रूढ आहे. रशियन स्पेस एजन्सीमध्ये रूढ असलेली परंपरा तर आणखीनच विचित्र आहे. कोणतेही स्पेस मिशन लॉन्च केले जाण्यापूर्वी या मिशनसाठी निघालेले अंतराळवीर त्यांना घेऊन ‘लॉन्चपॅड’ कडे निघालेल्या बसच्या मागच्या बाजूकडील डाव्या चाकावर मूत्रविसर्जन करतात ! यामुळे मिशन यशस्वी होत असल्याची मान्यता रशियन स्पेस एजन्सीमध्ये रूढ आहे.

Leave a Comment