बारा तासांमध्ये तब्बल पस्तीस कोटी झाडे लावून इथियोपियाने केला नवा विश्वविक्रम


इथियोपिया या आफ्रिकन देशाने सर्वात कमी वेळामध्ये कोट्यवधी झाडे लावण्याचा नवा आणि अनोखा विश्वविक्रम केला आहे. ‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार इथियोपियाच्या नागरिकांनी अवघ्या बारा तासांच्या आत तब्बल पस्तीस कोटी झाडे देशभरात लावली आहेत. इथियोपियाचे पंतप्रधान अबी मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ‘ग्रीन लेगसी’ या अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. ‘ग्रीन लेगसी’ हे एक व्यापक वनीकरण अभियान आहे.

या अभियानाच्या अंतर्गत इथियोपियन नागरिकांना देशभरामध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले गेले होते. या उपक्रमामध्ये समस्त देशाच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेत ठिकठीकाणी वृक्षारोपण केले. या उपक्रमाला सुरुवात झाल्याच्या सहा तासांच्या नंतर केलेल्या ट्वीटमध्ये अवघ्या सहा तासांमध्ये पंधरा कोटी झाडे लावली गेली असल्याची माहिती प्रधानमंत्री अबी मोहम्मद यांनी दिली होती. हा उपक्रम सुरु झाल्यानंतर बारा तासांच्या कालावधीनंतर इथियोपियाच्या मंत्री मंडळातील मंत्री गेताहून मेकुरीया यांनी बारा तासांच्या अवधीमध्ये देशभरामध्ये पस्तीस कोटी झाडे लावली गेली असल्याची माहिती ट्वीटर द्वारे दिली.

भारतामध्येही अश्या प्रकारचा उपक्रम २०१७ साली आयोजित केला गेला असता सुमारे पंधरा लाख नागरिक या उपक्रमांमध्ये सहभागी झाले असून बारा तासांच्या अवधीमध्ये सुमारे एक कोटी त्रेसष्ट लाख झाडे लावली जाण्याचा विक्रम त्यावर्षी नोंदला गेला होता.

Leave a Comment