रॉबर्ट वाड्रांना भेटली भविष्य सांगणारी गाय !


कॉंग्रेस पार्टीच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाद्रा अलीकडेच पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. पण यंदा ही चर्चा विवादीत मालमत्ता किंवा तत्सम विषयांशी निगडित नसून वेगळ्याच आणि काहीश्या अजब कारणामुळे सुरु आहे. रॉबर्ट यांना अलीकडेच भविष्य वर्तविणारी गाय भेटली असून, या गायीसोबतचे आपले छायाचित्र त्यांनी नुकतेच सोशल मिडीयावर शेअर केले आहे. तसेच रॉबर्ट रस्त्यावर सहज फेरफटका मारण्यास निघाले असतानाचे आपले अनुभवही त्यांनी छायाचित्राच्या सोबतच्या पोस्टमध्ये शेअर केले आहेत.

आपण फेरफटका मारण्यासाठी सहजच बाहेर पडलो असताना रस्त्याने हिंडताना भारतामध्ये सर्वच बाबतीत किती तरी विविधता असल्याचे आपल्याला जाणविले असल्याचे वाद्रा म्हणतात. तसेच रस्त्यावरून हिंडताना अनेक नवनव्या गोष्टींशी आपला परिचय होत असून, त्याद्वारे किती तरी गोष्टी शिकण्याची संधी मिळत असल्याचे ही वाद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्या याच फेरफटक्याच्या दरम्यान आपल्याला भविष्य वर्तविणारी गाय भेटली असल्याचे वाद्रा म्हणतात. आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ही गाय मान हलवून देत असल्याचे वाद्रा यांचे म्हणणे आहे.

वाद्रा यांनी या गायीसोबतचा एक व्हिडियो देखील अपलोड केला असून, या व्हिडियोमध्ये वाद्रा एका साधूबाबांच्या सोबत गप्पागोष्टी करताना दिसत आहेत. या साधूने ही गाय भविष्य वर्तवू शकत असल्याचे आपल्याला सांगितले असल्याचे वाद्रा म्हणतात. त्यानुसार वाद्रा यांनी आपले भविष्य या गायीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला किंवा नाही याचा उल्लेख मात्र वाद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेला नाही.

Leave a Comment