भाजपची नजर आता तेलंगाणा-आंध्रावर


दक्षिणेत कर्नाटकाचा किल्ला फत्ते केल्यानंतरआता भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची नजर आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाकडे वळली आहे. या दोन्ही तेलुगु भाषक राज्यांमध्ये पक्षाचा आधार वाढवण्याचा मार्ग मोठ्या प्रमाणात मोकळा झाल्याचे भाजप नेत्यांचे मत आहे.

आंध्र प्रदेशात काँग्रेस पूर्णपणे साफ झाली आहे, तर तेलुगु देसम पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात खालावला आहे. त्यामुळे भाजपची वाटचाल येथे सोपी झाल्याचे पक्षाचे मत आहे. राज्यात वायएसआर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवले. तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यातील 25 पैकी 22 जागा जिंकल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले तर तेलुगु देसम पक्षावर आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली. या निकालांमध्ये भाजपच्या गोटात मात्र उत्साहाचे वारे संचारू लागले. एक सशक्त विश्वासार्ह पर्याय म्हणून भाजपची तेथे स्थापना व्हावी, असा प्रयत्न भाजपच्या वतीने सुरू आहे. आंध्रातील राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून चंद्राबाबू नायडू दिसेनासे होत आहेत. एकानंतर एका मुद्द्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे. त्यामुळे आपली मूळे पसरण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे भाजप नेत्यांना वाटते.

इतकेच नव्हे तर आंध्रात भाजपचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे, की वायएसआर काँग्रेसशी दोन हात करण्यासही भाजपची तयारी असल्याचे दिसत आहे. जगनमोहन हे उत्तम प्रशासक नाहीत. त्यामुळे राज्याच्या प्रशासनावर त्यांची पकड नाही. तसेच वायएसआर काँग्रेसही पक्षांतर्गत राजकारणापासून दूर नाही. पक्षात असंतोष निर्माण होऊ नये म्हणून जगनमोहन यांना पाच-पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करावे लागले. आपल्या पक्षाला ते फार काळ एकत्र ठेवू शकणार नाहीत, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी वारंवार मागणी करूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही.

याशिवाय जगनमोहन यांनी भाजपच्या मार्गात फारच अडचणी निर्माण केल्या तर त्यांना भ्रष्टाचाराच्या विविध खटल्यांची भीती दाखवून त्यांना गप्प बसवता येईल, अशी भाजपची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांनी आंध्र प्रदेशात जाणार आहेत. त्यानंतर भाजप तेथे आपल्या विस्ताराच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करेल.

भाजपने आंध्रात सदस्यत्व मोहिमेला नुकतीच सुरूवात केली. “आमच्या सदस्यत्व मोहिमेला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे. अनेकांनी आम्हाला सांगितले, की त्यांना वायएसआर काँग्रेसचा कंटाळा आला आहे. खरे तर वायएसआर काँग्रेसच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आमदारांनी सरकारच्या कामकाजावर असंतोष व्यक्त केला आहे. यातून कळून येते, की भाजप हा राज्यातील मुख्य विरोधी पक्ष आहे,” असे राज्य भाजपचे चिटणीस विश्वनाथ राजू सागी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

इकडे तेलंगाणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत. मात्र पक्ष त्यांना फारसा भाव देण्यास उत्सुक नाही. आणखी कोणाशी युती करण्याऐवजी स्वबळावरच आपली संघटना वाढवावी, असा भाजप नेत्यांचा सूर आहे. तेलंगाणात भाजपने लोकसभेच्या चार जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे तेथे आपला जनाधार निर्माण झाल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. तेलंगाणात कॉँग्रेस कमकुवत झाली आहे आणि राज्यात विरोधक म्हणून भाजपला जागा घ्यायची आहे.

या रणनीतीचा एक भाग म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा ऑगस्ट महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा तेलंगाणाच्या दौर्‍यावर येतील. शहा यांच्याशिवाय दोन केंद्रीय मंत्री दर महिन्याला केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्यासाठी राज्याच्या दौर्‍यावर येतील. या महिन्याच्या सुरूवातीला तेलंगाणामध्ये शहा यांनी भाजपची सदस्यत्व मोहीम सुरू केली असून पक्षाची सदस्यसंख्या सध्याच्या 18 लाखांवरून दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे.

“तेलंगाणामध्ये विस्तार करण्याची ही सर्वात चांगली वेळ आहे,” असे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितले.
तेलंगाणात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ 7 टक्के मते मिळाली होती आणि 117 जागांपैकी केवळ एक जागा जिंकता आली. मात्र केवळ चार महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा वाटा 20 टक्क्यांवर गेला.

“ज्या राज्यांमध्ये आम्ही कमकुवत आहोत तेथे किमान 20 टक्के मते मिळवणे हे आमचे लक्ष्य आहे. एकदा आम्ही त्या पातळीवर पोहोचलो की आम्ही पुढे जाऊ, ”असे रेड्डी म्हणाले.

त्यामुळे कर्नाटकाच्या पाठोपाठ दक्षिणेत पसरणाऱ्यांसाठी भाजपला या दोन राज्यांत अनुकूल परिस्थिती दिसत आहे. त्याचा फायदा उठवण्यासाठी पक्ष तयार आहे.

Leave a Comment