बेंजामिन नेतन्याहू: कमांडोपासून पंतप्रधानपदापर्यंत


येत्या 17 सप्टेंबर रोजी इस्राएल देश आपल्या नव्या पंतप्रधानांची निवड करेल. सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हेही या पदाच्या शर्यतीत आहेत. आपल्या प्रचारासाठी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतची छायाचित्रे लावल्याबद्दल गेल्या आठवड्यात आपल्याकडे खूप चर्चा झाली. अरब देशांशी सतत तणावग्रस्त असलेले संबंध आणि संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी यांमुळे इस्राएलची आपल्याकडे तशीही सतत चर्चा असते. सध्याच्या स्फोटक परिस्थितीत तर या देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर सगळ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत.

भारतासाठीही ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे कारण संरक्षण, कृषी आणि सिंचन क्षेत्रात दोन्ही देशांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे भारताचे मित्र समजल्या जाणाऱ्या नेतन्याहू यांच्या कारकीर्दीवर एक दृष्टिक्षेप टाकणे अनाठायी होणार नाही.

बेंजामिन नेतन्याहू यांना इस्राएलची जनता बीबी या नावाने ओळखते. त्यांचा जन्म 1949 मध्ये तेल अवीव येथे झाला. त्यांचे कुटुंब 1963 मध्ये अमेरिकेला गेले होते. तिथे त्यांच्या इतिहासकार असलेल्या वडिलांना म्हणजे बेंजियन यांना शिक्षण क्षेत्रातील एक पद मिळाले होते. मात्र 18 व्या वर्षी बेंजामिन इस्राएलला परत आले आणि त्यांनी पाच वर्षे इस्राएली सेनेत घालवली. या काळात इस्राएली सेनेच्या प्रतिष्ठित अशा ‘सायरेत मटकल’ या कमांडो यूनिटमध्ये त्यांनी काम केले. बैरूतच्या विमानतळावर सायरेत मटकलने केलेल्या एका कारवाईत त्यांनी भाग घेतला होता आणि 1973 मधील युद्धातही ते सहभागी झाले.

बेंजामिन यांचे वडील बंधू जोनाथन नेतन्याहू हेही सैन्यात होते. युगांडाचा हुकूमशहा इदी अमीन याच्या हुकूमावरून 1976 साली इस्राएली विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्या विमानाच्या सुटकेसाठी अँटेबे येथे झालेल्या कारवाईत जोनाथन हे शहीद झाले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले होते.

बेंजामिन हे 1988 साली इस्राएलला परत आले आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत लिकुड पार्टीच्या वतीने जिंकून ते नेसेटचे (संसद) बनले. त्यानंतर त्यांना इस्राएलचे उप परराष्ट्रमंत्री करण्यात आले. पुढे ते लिकुड पार्टीचे अध्यक्ष झाले. तत्कालीन पंतप्रधान इत्झॅक राबिन यांची 1996 मध्ये हत्या झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ते पंतप्रधान झाले. इस्राएलच्या निर्मितीनंतर जन्म होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. तसेच देशाचा सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मानही त्यांना मिळाला.

त्यावेळी इस्राएल व पॅलेस्टाईन दरम्यान ओस्लो करार मान्य केल्याबद्दल त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. या करारानुसार हेब्रॉन शहराचा 80 टक्के भाग पॅलेस्टाईनला देण्यास तसेच वेस्ट बॅंक भागावर कब्जा सोडण्यास इस्राएलने संमती दिली होती. या नाराजीमुळे 1999 साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. नेतन्याहू यांना तर लिकुड पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतरच्या एहुद बराक यांच्या सरकारचा कार्यकाळ अल्प ठरला आणि 2001 मध्ये एरियल शेरॉन इस्राएलचे नवे पंतप्रधान बनले. शेरॉन हे त्यावेळी नेतन्याहू यांच्यानंतर लिकुड पार्टीचे अध्यक्ष झाले होते. हे बेंजामिन यांचे सत्तेतील पुनरागमन ठरले. ते आधी परराष्ट्रमंत्री व नंतर अर्थमंत्री बनले. गाझा पट्टीतून इस्राएलने माघार घेण्याच्या मुद्द्यावरून 2005 साली ते सरकारमधून बाहेर पडले. शेरॉन आणि यासिर अराफात यांच्यात हा करार झाला होता.

मात्र 2005 मध्येच पंतप्रधान एरियल शेरॉन पक्षाघात झाल्यामुळे कोमात गेले. त्यानंतर नेतन्याहू यांना पुन्हा लिकुड पार्टीच्या नेतेपदी निवडण्यात आले. सन 2009 मध्ये निवडणुका जिंकून ते इस्राएलचे पंतप्रधान बनले. त्यानंतर 2013 व 2015 मध्येही त्यांनी पंतप्रधानपद प्राप्त केले.

यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीतही नेतन्याहू यांनी उल्लेखनीय यश मिळवले होते. इस्राएलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक दिवसांचा विक्रम त्यांच्या नावे जमा आहे. मात्र एका सैन्य विधेयकावरून संमती निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर इस्राएली संसद सदस्यांनी अभूतपूर्व पाऊल उचलत संसद भंग करण्याच्या बाजूने मतदान केले. भ्रष्टाचराच्या विविध प्रकरणांमुळेही नेतन्याहू हे अडचणीत आले आहेत.

नेतन्याहू यांच्या विरोधात इस्राएली सेनेचे माजी प्रमुख बेनी गांट्ज उभे ठाकले असून त्यांचा इस्राएल रेसिलिएन्स हा पक्ष नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला टक्कर देत आहे. बेनी गांट्ज यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ नेता म्हणून आहे. याशिवाय तेलेम आणि येश अतिद या अन्य दोन प्रमुख पक्षांसोबत मिळून त्यांनी ‘ब्लू अँड व्हाईट’ आघाडी स्थापन केली आहे. त्यांचे आव्हान नेतन्याहू कसे झेलतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Leave a Comment