सर्वाधिक किंमतीच्या चहाच्या विक्रीतून जमा झालेली धनराशी पूरग्रस्तांसाठी खर्च


आसाम येथील सुप्रसिद्ध ‘गोल्डन टिप्स’ चहा लिलावामध्ये किलोमागे ७०,५०१ रुपये प्रतीकिलो या विक्रमी भावामध्ये विकला गेला आहे. यामुळे चहाची ही प्रजाती सर्वाधिक किंमतीला विकली गेलेली प्रजाती ठरली असली, तरी विशेष गोष्ट अशी, की या चहाच्या विक्रीतून जमा झाल्लेली धनराशी गोरगरिबांच्या आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जात आहे. गोरगरीबांसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ही धनराशी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करविण्यात आली असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांमध्ये आसाममध्ये ‘गोल्डन टिप्स’चहाच्या विक्रीसाठी लिलाव आयोजित केले जात आहेत. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी या चहाला प्रती किलोमागे पन्नास हजार रुपये इतका दर मिळाला होता. पण बुधवारी ३१ जुलै रोजी या चहाला प्रती किलोमागे सत्तर हजारांहूनही अधिक विक्रमी दर मिळाला आहे.

आसामची खासियत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चहाचे लिलाव ‘गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर’ द्वारे आयोजित केले गेले असून, या चहाचे उत्पादन ‘मैजान गार्डन ऑफ आसाम’ने केले आहे. प्रती किलोमागे सर्वाधिक दर मिळणारी अशी ही चहाची प्रजाती आहे. आसाम हा जगभरातील सर्वाधिक चहाचे उत्पादन करणारा प्रदेश असून, गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर ही जगभरातील सर्वाधिक व्यस्त असलेली चहाची बाजारपेठ समजली जाते. या बाजारपेठेमध्ये नित्यनेमाने अनेक उत्तम प्रतीच्या चहांच्या प्रजातींचे लिलाव आणि विक्री होत असते.

Leave a Comment