
सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंच्या जाण्यामुळे होत असलेल्या वादाला पूर्णविराम देताना शिवेंद्रराजेंच्या जाण्याने राष्ट्रवादीला काही एक फरक पडणार नसल्याचे म्हणत त्यांनी उदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. शरद पवार साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी निश्चितच साताऱ्याची जागा राखेल, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
शिवेंद्रराजेंच्या जाण्याने राष्ट्रवादीला काही फरक पडणार नाही – शरद पवार
यासोबतच, पक्ष सोडताना एसीबीच्या खटल्याचे कारण चित्रा वाघ यांनी दिले होते. गटबाजीमुळे त्यांनी पक्ष सोडला नसल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ९ ऑगस्ट रोजी ‘ईव्हीएम’वर जनमत घेण्यासाठी कार्यक्रम घेणार असल्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. मोठमोठे आमदार विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादी चांगलीच अडचणीत सापडली आहे. त्यामुळे शरद पवार या परिस्थितीला कसे सामोरे जातात ते पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
