कुलभूषण जाधव यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा


नवी दिल्ली – पाकिस्तानातील तुरुंगात हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत (कॉन्स्युलर एक्सिस) मिळवून देण्यासाठी पाकिस्तान तयार झाला असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. उद्या भारतीय दुतावासाची मदत यानुसार कुलभूषण जाधव यांना दिली जाणार असल्यामुळे आता राजनैतिक मदत कुलभूषण जाधव यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर नरमलेल्या पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि राजनैतिक संपर्काची अनुमती त्यांना द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. तर, कुलभूषण जाधव यांना तीन वर्षांपासून भारतीय दुतावासाची मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती. पण पाकिस्तानने जाधव यांना राजनैतिक मदत आजपर्यंत मिळवून दिलेली नव्हती.

‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारताने ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

Leave a Comment