पुढील वर्षापासून ‘संघ’ सुरु करणार ‘सैनिक स्कूल’


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुढल्या वर्षीच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून ‘सैनिक स्कूल’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या विद्यालयामध्ये शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना सैन्यामध्ये अधिकारी म्हणून भर्ती होण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. हे विद्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘एज्युकेशन विंग’ असलेल्या विद्याभारतीच्या देखरेखीखाली सुरु करण्यात येणार असून, माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह, उर्फ रज्जू भैय्या यांचे नाव या विद्यालयाला देण्यात येणार आहे. विद्याभरतीच्या वतीने चालविले जाणारे शैक्षणिक कार्य खूप मोठे असून, देशभरामध्ये वीस हजार शाळा विद्याभारतीच्या वतीने चालविल्या जात आहेत. अश्या प्रकारे सैनिक स्कूल सुरु करण्याचा उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्रथमच राबविला जात असून, भविष्यामध्ये इतरही अनेक ठिकाणी ही विद्यालये स्थापन करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मानस आहे.

या विद्यालयामध्ये इयता सहावी पासून ते इयत्ता बारावी पर्यंतचे वर्ग असून, पुढल्या वर्षातील नव्या शैक्षणिक वर्षापासून, म्हणजेच एक एप्रिल पासून हे वर्ग सुरु केले जाणार आहेत. ‘रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर’ असे या विद्यालयाचे नाव असणार असून, हे विद्यालय रज्जू भैय्या यांचे जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातल्या शिकरपूर गावामध्ये स्थापन केले जाणार आहे. या विद्यालयामध्ये पुढील शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता सहावीसाठी एकूण एकशे साठ मुलांना प्रवेश दिला जाणर असून, हे विद्यार्थी विद्यालयाच्या छात्रावासामधेच राहणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण एकशे साठ जागांपैकी छपन्न जागा, देशासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शहिदांच्या मुलांसाठी राखीव असणार आहेत.

या विद्यालयामधील अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
या विद्यालयाचे कामकाज कश्या पद्धतीने चालविले जावे यासंबंधी सूचना देण्यासाठी निवृत्त सैन्याधिकाऱ्यांना पाचारण केले गेले असून, प्रत्यक्ष भेटून अथवा पत्रलेखनाद्वारे आपल्या सूचना निवृत्त सैन्याधिकाऱ्यांना देता येणार आहेत. यासाठी अनेक निवृत्त अधिकारी आणि त्यांच्याशी संलग्न इतर संस्थांशी संपर्क साधण्याचे काम सध्या सुरु असून, लवकरच प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. या विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाला गतवर्षीच सुरुवात झाली असून वीस हजार स्क्वेअर मीटर एवढ्या जागेमध्ये या विद्यालयाचा विस्तार असणार आहे. ही जागा निवृत्त सैनिक राजपाल सिंह यांच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या मालकीची असून ती त्यांनी या विद्यालयासाठी देऊ केली आहे. विद्यालयाची इमारत तीन मजली बनणार असून, त्याव्यतिरिक्त मुलांना राहण्यासाठी तीन मजली वसतिगृह, रुग्णालय, विद्यालयातील शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांना राहण्यासाठी घरे, आणि एका मोठ्या क्रीडा संकुलाचा समावेश असणार आहे.

Leave a Comment