ओसामा लादेनचा मुलगा हमजा ठार?


अल कायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ल्याचा सूत्रधार कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थांकडून सांगितले गेल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्स आणि सीएनएनवरून दिले गेले आहे. हमजा याने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिकेवर हल्ले करण्याची तयारी सुरु केली होती आणि त्यामुळे अमेरिकेने हमजाची माहिती देणाऱ्याला १० लाख डॉलर्सचे इनाम जाहीर केले होते. हमजा याला अमेरिकेने ठार केले का याचा खुलासा केला गेलेला नाही तसेच त्याला कुठे आणि कसे ठार केले याचीही माहिती मिळू शकलेली नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या संदर्भात बुधवारी प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी त्यावर कॉमेंट करण्यास नकार दिला आहे. हमजा जिहादी युवराज या नावाने ओळखला जात होता. तो गेले काही दिवस अमेरिकेचा सूड घेणार असल्याचे व्हिडीओ आणि ऑडीओ जारी करत होता मात्र त्याचा ठावठिकाणा समजू शकत नव्हता. काही जणांच्या मते तो इराण मध्ये नजरकैदेत होता तर काही रीपोर्ट नुसार तो पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि सिरीया भागात होता. त्याचे नुकतेच लग्न झाले असून त्याने ९/११ हल्ला प्रकरणात विमान हायजॅक करणाऱ्या मोहम्मद अत्ता याच्या मुलीशी लग्न केले होते. तो ३० वर्षाचा असावा असा अंदाज आहे. त्याची पत्नी इजिप्तची नागरिक आहे.

Leave a Comment