या लठ्ठ तरुणांचे करायचे काय – अमेरिकेच्या सैन्यासमोर प्रश्न


एकीकडे अमेरिकेच्या सैन्यात अधिकाधिक तरुणांनी भरती व्हावे, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आवाहन करत आहेत. देशाच्या सैन्यात तरुणांची संख्या वाढेल, असा आशावाद व्यक्त करत आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या सैन्यात नवीन सैनिकांची भरतीच कमी होत आहे. याचे कारण दुसरे-तिसरे काही नसून अमेरिकी तरुणांमध्ये वाढणारा लठ्ठपणा आहे. आता या लठ्ठांचे काय करायचे असा प्रश्न सेनाधिकाऱ्यांना पडला आहे.

गेल्या 4 जुलै रोजी म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाधिक अमेरिकन लोकांनी सैन्यात सामील व्हावे, असे आवाहन केले होते. “आपल्या देशातील तरुण अमेरिकन लोकांना आता आपल्या सैन्यात सामील होण्याची आणि जीवनात खरोखर चांगले कार्य करण्याची संधी आहे आणि आपण ते केलेच पाहिजे”, असे ट्रम्प यांनी लिंकन मेमोरियल येथे केलेल्या भाषणात म्हटले होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी आपल्या निवेदनामुळे सैन्यात येणाऱ्या तरुणांची संख्या वाढेल, असा विश्वास व्हाईट हाऊसच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. “आपल्या सैन्यात खूप लोक सामील होतील,” असे ते म्हणाले होते.

मात्र सरकारी आकडेवारी काही वेगळेच सांगते. अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या 2016 च्या अहवालात म्हटले आहे, की जवळजवळ75 टक्के तरुण अमेरिकन सैन्यात सेवा बजावूच शकत नाहीत. याला कारण मुख्यतः त्यांचे वजन जास्त असणे हे होते. त्याचमुळे सैन्यात भरती होणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. संरक्षण खात्याच्या माहितीनुसार, नौदल, सागरी सुरक्षा आणि हवाई दलाचे भरतीचे लक्ष्य 2018 मध्ये पूर्ण झाले मात्र पायदळाचे (आर्मी) नाही झाले. सैन्याचे लक्ष्य 76,500 जणांच्या भरतीचे होते मात्र प्रत्यक्षात 6,000 जागा कमी भरल्या.

याच प्रकारे ‘मिशनः रेडीनेस’ या संस्थेने 2018 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की 17 ते 24 वयोगटातील 71 टक्के अमेरिकी युवक सैन्य सेवेसाठी असलेल्या मूलभूत अटीही पूर्ण करू शकत नाहीत. ‘मिशनः रेडीनेस’ ही संस्था 750 सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी बनविलेली संस्था असून ती सरकारला धोरणात्मक बाबींवर सल्ला देते.

तरुणांना सैन्य सेवेसाठी अपात्र बनविणारी सर्वात मोठी समस्या ही लठ्ठपणाची आहे. वजन जास्त असल्यामुळे जवळजवळ 31 टक्के अमेरिकन तरुणांना सैन्यात प्रवेश नाकारला जाऊ शकतो. अमेरिकेतील लठ्ठपणाची आकडेवारी भयावह आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षांपर्यंतच 14 टक्के अमेरिकन मुले लठ्ठ असतात. जसजसे मुलांचे वय वाढत जाते तसतसे ही टक्केवारी वाढत जाते. वय वर्षे 16 ते 19 या वयोगटातील 42 टक्के अमेरिकी लोक अतिवजनदार असतात. जवळजवळ 70 टक्के लठ्ठ किशोर हे अतिवजनदार किंवा लठ्ठ प्रौढ व्यक्ती बनतात. जॉर्जिया आणि अलाबामा यांसारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही समस्या अतिशय गंभीर आहे. या राज्यांतून मोठ्या संख्येने लोक सैन्यात भरती होतात, मात्र याच राज्यांमध्ये देशात लठ्ठपणाची सर्धाधिक पातळी आहे.

शिक्षणाचा अभाव, गुन्हेगारी इतिहास आणि मादक पदार्थांचा वापर ही अन्य काही कारणे आहेत. ‘मिशनः रेडीनेस’मधील सेवानिवृत्त आर्मी मेजर जनरल अॅलन यंगमॅन यांनी व्हॉईस ऑफ अमेरिकेशी बोलताना सांगितले की, हायस्कूल उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 25 टक्के विद्यार्थी प्राथमिक सैन्य प्रवेश चाचणीसुद्ध उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत.

केवळ भरतीसाठी पात्र असलेल्या तरुणांची संख्याच घटत आहे, असे नाही तर सैन्य कारकीर्दीत रस असलेल्या तरूण अमेरिकन लोकांची संख्याही कमी होत असल्याचे या अहवालात आढळले आहे. याला एक कारण अमेरिकेची मजबूत राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे. तरुणांसाठी नोकरीच्या बर्‍याच संधी उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्यांना सैन्यात करिअर करण्याची इच्छा नसते, असे यंगमॅन यांचे म्हणणे आहे.

एकीकडे ही स्थिती तर दुसरीकडे सध्या सैन्यात सेवा बजावणाऱ्यांचीही संख्या कमी होत आहे. त्यामुळे ही समस्या आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. तरुणांना सैन्य सेवेसाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीही सैन्यात कमी झाल्या आहेत, असे यंगमॅन यांचे मत आहे.

जगाची पोलिसगिरी करणाऱ्या अमेरिकेसाठी तिचे सैन्य आणि सैन्यशक्ती ही अभिमानाची बाब आहे. मात्र या सैन्यात येणाऱ्या नव्या तरुणांचाच ओघ आटला तर ती आपले वर्चस्व राखू शकेल काय, हा प्रश्नही यानिमित्ताने समोर येतो. यावर अमेरिका कसा मार्ग काढते, हे पाहणे आपल्यासाठीही बरेच काही शिकवणारे ठरेल.

Leave a Comment