व्ही. जी. सिद्धार्थ – बेगडी यशामागचे भीषण वास्तव


‘कॅफे कॉफी डे’चे मालक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह अखेर सापडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गाजत असलेल्या एका प्रकरणावर पडदा पडायला हरकत नाही. मंगळुरु येथील नेत्रावती नदीत सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला. ते स्वतःच्या घरातून नाहीसे झाले होते आणि तब्बल 36 तासांनंतर त्यांच्या आत्महत्येबाबत निश्चित माहिती मिळाली.

भारतात श्रीमंत लोकांच्या चर्चा दोनच बाबतीत होतात – एक तर त्यांच्या खासगी कार्यक्रमांवर (लग्न इत्यादी) केलेल्या बेसुमार खर्चाच्या संदर्भात किंवा लोकांची अथवा बँकेची फसवणूक करून पळाल्याच्या संदर्भात. याशिवाय तिसऱ्या कारणाबाबत क्वचितच कोणी चर्चेत येतो. व्ही. जी. सिद्धार्थ हे याला अपवाद ठरले. कॅफे कॉफी डे या अत्यंत यशस्वी दुकान शृंखलेचे मालक असूनही ते कधी वाद-विवादात सापडले नाहीत किंवा त्यांनी कोणाची फसवणूक केल्याचेही कधी कानावर आले नाही. ते चर्चेत आले ते त्यांच्या अपयशामुळे!

सोमवारी संध्याकाळी घरातून बेपत्ता झाल्यामुळे सिद्धार्थ यांचे नाव देशभरातील माध्यमांमध्ये झळकू लागले. सामान्य लोकांच्या दृष्टीने हे नाव फारसे परिचयाचे नव्हते. परंतु त्यांनी निर्माण केलेल्या कॅफे कॉफी डे म्हणजेच सीसीडीचे नाव चांगलेच रूळलेले आहे. सिद्धार्थ हे सीसीडीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. कॅफेत बसून मनसोक्त गप्पा मारण्याची संस्कृती पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र ही संस्कृती भारतात रूजविण्याचे श्रेय सीसीडीला जाते. सीसीडीचे आऊटलेट देशभरात पसरलेले आहेत. शहरी भागांत आणि विशेषतः व्यावसायिकांमध्ये ते लोकप्रिय आहेत.

सिद्धार्थ यांनी कंपनीच्या संचालक मंडळाच्या नावे लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. मात्र त्यातील दोन बाबी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली ही, की सिद्धार्थ यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली होती आणि सीसीडीची स्थितीही तितकीच वाईट आहे. कंपनी पूर्णपणे दिवाळखोर झाली असून आता कंपनीचा गाडा ओढण्याची आपली क्षमता राहिलेली नाही, याची कबुली त्यांनी दिली आहे. डोक्यावर जेवढे केस आहेत त्यापेक्षा जास्त लोकांचे देणे झाले आहे आणि त्यामुळे शेवटचा मार्ग पत्करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

दुसरी गोष्ट ही की प्राप्तिकर खात्याने सिद्धार्थ यांच्यामागे ससेमिरा लावला होता. त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते पूर्णपणे खच्ची झाले होते. प्राप्तिकर खात्याच्या माजी महासंचालकांचे नाव घेऊन सिद्धार्थ यांनी आरोप केला असून सीसीडीच्या आर्थिक संकटासाठी त्यांनाच दोषी धरले आहे. मला कोणाची फसवणूक करायची नव्हती मात्र एक धाडसी उद्योजक म्हणून मी पूर्णपणे अपयशी ठरलो आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कंपनीच्या आर्थिक अपयशासाठी त्यांनी पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

सिद्धार्थ यांच्या या आत्महत्येने दोन गोष्टी समोर आल्या आहेत. हे एक प्रकारे हे देशाचे कटू वास्तव आहे. एक म्हणजे या देशात व्यवसाय करून यशस्वी होणे सोपे राहिलेले नाही. दुसरे म्हणजे भारताच्या सरकारी यंत्रणेच्या दृष्टीत सगळे लोक किरकोळ आहेत आणि कोणाचाही छळ करताना ही यंत्रणा मागेपुढे पाहत नाही. मोठ्या व्यावसायिक साम्राज्याच्या चकचकीतपणाला आपण भूलतो आणि हे साम्राज्य उभे करणाऱ्यांवर भाळतो. त्यांना यशस्वी समजून आपण त्यांच्या रस्त्यांवरून चालण्याचा प्रयत्नही करतो. मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये या चकचकाटाखालचे वास्तव अत्यंत भीषण असते. विजय माल्याने कित्येक वर्षे आपले बीअर आणि विमानसेवेचे साम्राज चालवले, आज तो इंग्लंडमध्ये निर्वासिताचे जीवन जगत आहे. अनिल अंबानीसारख्या जन्मजात उद्योगपतीच्या बाबतही हेच खरे आहे. आपल्याकडे डी. एस. कुलकर्णी यांचे उदाहरण सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे.

सिद्धार्थ यांनाही असेच रोल मॉडल मानले जात होते. त्यांच्या व्यवसायाची यशोगाथा बिझिनेस स्कूलमध्ये शिकवली जात होती. बंगळूर येथे 1996 मध्ये पहिले आऊटलेट सुरू झालेल्या सीसीडीची आज देशभरात 1800 आऊटलेट आहेत. त्यातून 30 हजार लोकांना थेट रोजगार मिळतो. सुमारे 20 हजार एकरवर सीसीडीच्या कॉफीचे मळे आहेत. शिवाय 3000 एकरांवर केळ्यांची लागवड करून त्यांची निर्यात केली जाते. सिद्धार्थ यांची शेअर ब्रोकर कंपनीही चांगली चालते आणि त्यांची फर्निचरची कंपनीही आहे. याशिवाय माइंडट्री नावाची आयटी कंपनीही त्यांनी काढली होती. या सर्व कंपन्या चांगल्या व्यवसाय करतात, असे मानले जात होते, मात्र त्यांच्या आत्महत्येने हा बुडबुडा फोडला आहे. त्यांच्या मृत्यूने भारतातील व्यवसायांच्या बेगडी यशामागचे भीषण वास्तव समोर आणले आहे.

Leave a Comment