विक्की कौशलला व्हायचेय रोमँटिक


देशभक्तीपर चित्रपटातून चित्रपट रसिकांच्या हृदयात प्रेमाचे स्थान निर्माण केलेल्या विक्की कौशलने रोमँटिक चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणतो एखादा चांगली कथा असलेला रोमँटिक चित्रपट मिळाला तर त्यात जरूर भूमिका करेन. प्रेक्षकांनी मला रोमान्स करतानाही पाहावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक चित्रपटाला एक रोमँटिक अँगल असतोच. प्रत्येक सिनेमात तो किती प्रमाणात असेल हे मी सांगू शकत नाही.

विक्कीच्या उरी, द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक नोंदविला असून आता तो मेघना गुलजारच्या फिल्ड मार्शल माणेकशा चित्रपटात माणेकशा यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शुटींग २०२० मध्ये सुरु होणार आहे. विक्की म्हणाला सॅम बहादूर माणेकशा यांची भूमिका साकारायला मिळणे हे माझे खरोखर भाग्य आहे. त्यांचा जन्म अमृतसरचा होता आणि माझे आईवडील पंजाब मध्ये होते तेव्हा त्यांनी भारत पाकिस्तान युध्द जवळून पहिले आहे. या चित्रपटाची कथा मी ऐकली तेव्हा भारावून गेलो. माणेकशा यांचे देश निर्मितीत मोठे योगदान आहे. ते भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते.

विक्की सध्या सरदार उधमसिंग या चित्रपटात व्यस्त असून त्याने त्याचे सर्व लक्ष याच चित्रपटावर केंद्रित केले आहे. यापूर्वी राजी, उरी चित्रपटात त्याने लष्करी अधिकारयाच्या भूमिकेत त्याचे अभिनय कौशल्य दाखविले आहे आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Leave a Comment