रशिया चीन जोडणारी केबल कार होतेय सुरु


चीन आणि रशिया या दोन देशांना जोडणारी केबल कार सेवा लवकरच सुरु होत आहे. या मुळे हा प्रवास काही मिनिटात करता येणार आहे. या प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट असून २०२० मध्ये तो कार्यान्वित होईल असे सांगितले जात आहे. केबल कार मुळे हा प्रवास पहिल्यापेक्षा अधिक सुंदर व रोमांचक होणार आहे. केबल कार मधून जाताना दोन्ही देशांचे सौदर्य एकाचवेळी प्रवासी अनुभवू शकणार आहेत.

चीनच्या हिहे आणि रशियाच्या ब्लागोवेशचेन्स्क या दोन शहरांच्या मध्ये वाहणाऱ्या अमूर नदीवर ही केबल कार उभारली जात आहे. चीन आणि रशियाच्या मधून ही नदी २९०० किमीचा प्रवास करते आणि तिच्या तीरावर दोन्ही देशातील सात शहरे आहेत. आत्तापर्यंत हा प्रवास छोट्या मोठ्या नौकातून केला जात असे. पण हिवाळ्यात ही नदी गोठते. केबल कार मुळे नदी गोठली तरी प्रवास अबाधित राहणार आहे. यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

या केबल कार मध्ये प्रत्येक केबिन मध्ये आठ सीट असतील. लगेज साठी वेगळी जागा असेल. १५ मिनिटात नदीच्या एका तीरावरून दुसरीकडे येजा करता येणार आहे. या प्रकल्पाचे डिझाईन डच आर्किटेक्टने केले आहे. जगभरात सर्वत्र सध्या केबल कार हा वाहतुकीचा नवा पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे. केबल कारचा प्रवास वेगवान आहेच पण अन्य प्रवास पर्यायांपेक्षा तो स्वस्तही आहे.

Leave a Comment