गावकरी आणि गरीब? विचारा चॉकलेट कंपन्यांना


काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ शहरी लोकांपुरत्या मर्यादित असलेल्या चॉकलेटने आता चांगलेच पाय पसरले आहेत. त्यामुळे चॉकलेट कंपन्याही खूश असून जगात सर्वाधिक गुंतवणूक भारतात करण्यास या कंपन्या सज्ज झाल्या आहेत.

कॅडबरी चॉकलेट हे आजपर्यंत महागडे म्हणून ओळखल्या जात होते. त्यांची किंमत 70 ते 170 रुपये असून सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर ते मानले जात होते. सामान्य भारतीयांना रुपया-दोन रुपयांची चॉकलेट चालून जात होती आणि अशी ब्रँडेड चॉकलेट ही ठरावीक वर्गापुरती मर्यादित होती. मात्र आता ग्रामीण भागांतही कॅडबरीची चॉकलेट सर्रास विकली जात आहेत. ई-कॉमर्समध्ये झालेली वाढ आणि करांमध्ये झालेली मोठी घट यांमुळे या चॉकलेटची विक्री वाढली आहे. आज ही बाजारपेठ छोटी आहे मात्र त्यातील वाढ लक्षणीय आहे.

त्यामुळे कॅडबरी ब्रँडच्या चॉकलेटचे उत्पादन करणाऱ्या मोंडेलेझ कंपनीलाही हुरूप आला आहे. तसेच नेस्ले एसए आणि हर्शी या कंपन्यांनीही या बाजारपेठे लक्ष केंद्रित केले आहे. मोंडेलेझ ही कंपनी मूळची अमेरिकेतील इलियाना या राज्यातील. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच कंपनीने आपली गुंतवणूक वाढविण्याचे ठरविले असून त्यासाठी १५ कोटी डॉलरची रक्कम राखून ठेवली आहे. या गुंतवणुकीपैकी मोठा वाटा भारतातील ग्रामीण भागांसाठी असेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले.

या कंपनीने सुरूवातीला छोट्या-छोट्या दुकानदारांना डिस्प्ले कूलर्स मोफत वाटण्यास सुरूवात केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात कंपनीने ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून तेथील वितरण व्यवस्था मजबूत केली. गेल्या वर्षी २०१८ मध्ये कंपनी ५० हजार गावांपर्यंत पोचली होती आणि आता पुढच्या तीन वर्षांत 75 हजार ते एक लाख गावांपर्यंत पोचण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी देशाच्या गावागावांतील छोट्या दुकानांची माहिती कंपनी गोळा करत असून या दुकानांमध्ये होणाऱ्या विक्रीवर कंपनीची नजर आहे.

“ग्रामीण ग्राहक हे गरीब असल्याचा एक गैरसमज आहे. सर्वच ग्रामीण लोक गरीब नाहीत. काही शेतकरी श्रीमंतही आहेत आणि ते ग्राहकांच्या वर्गात येत आहेत,” अले मोंडेलेझचे भारतासाठी व्यवस्थापकीय संचालक दीपक अय्यर यांनी सांगितले. अगदी ३००० लोकसंख्या असलेल्या गावांवरही मोंडेलेझने लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.

कॅडबरी हे नाव तसे भारतात तरी अपरिचित नाही. मूळची ब्रिटिश असलेली १९५ वर्षे कॅडबरी भारतात 1948 साली आली. डेअरी मिल्क सिल्क आणि 5स्टार ही तिची चॉकलेट बहुतेक भारतीयांना माहीत आहेत. एकट्या डेअरी मिल्कचा बाजारपेठेतील वाटा 40 टक्क्यांचा आहे. संपूर्ण देशात तिचे वितरण जाळे पसरले असून ते गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. म्हणूनच क्राफ्ट फूड या कंपनीने तब्बल १९.६ अब्ज डॉलर मोजून कॅडबरीचे २०१० मध्ये अधिग्रहण केले होते. मात्र नंतर क्राफ्ट कंपनीची दोन शकले झाली आणि कॅडबरी हा ब्रँड मोंडेलेझ या कंपनीकडे आला. आज भारतातील चॉकलेटच्या बाजारपेठेत तिचा ६६ टक्के वाटा आहे.

युरोमॉनिटर या संस्थेच्या मते, मोंडेलेझच्या खालोखाल क्रमांक दोनवर नेस्ले आणि फेरेरो व हर्शी या कंपन्यांचा अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक आहे. मात्र या कंपन्यांनी बाजारपेठेतील आपल्या हिश्श्याची माहिती दिलेली नाही.

आज भारतातील चॉकलेटची बाजारपेठ १९ अब्ज डॉलरची आहे आणि चीनमध्ये हीच बाजारपेठ 3.2 अब्ज डॉलरची आहे. मात्र अमेरिकेतील १९.२ डॉलरच्या बाजारपेठेच्या तुलनेत या दोन्ही देशांतील व्यवसाय तुटपुंजा आहे. त्यामुळे तिच्या वाढीला आणखी संधी आहे. गेल्या वर्षी सरकारने चॉकलेटवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला. त्यामुळे चॉकलेटच्या विक्रीत १५.४ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांनीही जाहिरात व प्रसारावरील खर्च तिपटीने वाढवला आहे, असे नीएल्सन या कंपनीने म्हटले आहे. तसेच चॉकलेटच्या ऑनलाईन विक्रीतही इतकी वाढ झाली आहे, की मोंडेलेझने अॅमॅझॉनवर केवळ कॅडबरीचा एक विभाग काढला आहे.

नेस्ले कंपनीनेही आपली गुंतवणूक वाढवली आहे आणि हर्शी कंपनी या दोन्हींशी चढाओढ करत आहे. नुकतेच या कंपनीने भारतातील चौथी मोठी चॉकलेट कंपनी म्हणून मार्स कंपनीची जागा घेतली. मात्र तिची उत्पादने भारतातील केवळ १४ शहरांत आणि अॅमॅझॉन, बिगबास्केट आणि फ्लिपकार्ट अशा संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

Leave a Comment