परदेशात शिक्षणासाठी जाण्यापूर्वी…


पदवी पर्यंतचे शिक्षण भारतामध्ये झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळणे, ही कुठल्याही विद्यार्थ्याच्या दृष्टीने मोठी गोष्ट असते. या निर्णयाने विद्यार्थ्यांचे संपूर्ण आयुष्यच जणू बदलून जाते. परक्या देशामध्ये जाऊन तिथे रहावे लागत असल्याने तिथल्या संस्कृतीशी आणि जीवनशैलीशी समरस होतानाच, तिथल्या विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याने भविष्यामध्ये नोकरीच्या उत्तम संधी चालून येण्याची संभाव्यताही वाढते. मात्र परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्यापूर्वी अनेक गोष्टी ध्यानी घेऊन विचार पूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते. त्यामध्ये सर्वात प्रमुख निर्णय, कुठल्या विषयातील कुठल्या पदवीसाठी अर्ज करावयाचा, हा असतो. तसेच आपण ज्या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणार असू, त्याचे व्यावसायिक क्षेत्रामध्ये कितपत महत्व आहे, आणि सामान्य पदवीपेक्षा या कोर्सचा कितपत अधिक फायदा होणार आहे, हे जाणून घेणेही महत्वाचे ठरते. यासाठी अर्ज करण्यापूर्वीच आपल्याला करायच्या कोर्सची आणि संबंधित विद्यापीठाची सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असताना विद्यार्थी आणि पालक यांच्यापुढला सर्वात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे परदेशामध्ये शिक्षण घेणे परवडू शकणार आहे किंवा नाही, याचा. म्हणूनच एखाद्या कोर्सचे चयन करण्यापूर्वी कोणकोणत्या परदेशी विद्यापीठांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे, आणि त्याचसोबत त्या कोर्सचे ‘फी स्ट्रक्चर’ कोणत्या विद्यापीठामध्ये कसे आहे याची सविस्तर माहिती करून घेणे आवश्यक आहे. परदेशी शिक्षणासाठी जाताना केवळ शिक्षणाचा खर्चच नाही, तर तिथे राहण्याचा, जेवण्या-खाण्याचा, कपडे, प्रसंगी अचानक उद्भवलेली आजारपणे, मोबाईल बिल्स, कामानिमित्त किंवा इतर काही कारणांनिमित्त करावा लागणारा दररोजचा प्रवास, या सर्वच गोष्टींसाठीचा खर्च विचारात घेणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींबद्द्लची खात्रीपूर्वक माहिती ऑनलाईन उपलब्ध असली, तरी आवश्यकता भासल्यास एज्युकेशन काउन्सेलरचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते. एकदा कुठल्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे याची निश्चिती झाली, की सर्वात उत्तम पर्याय देणारे स्टुडंट्स लोन, सोयीचे असतील असे मासिक हप्ते, या सर्व गोष्टींची चौकशी करावी.

परदेशी विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून भारतमध्ये परतायचे असल्यास, किंवा परदेशातच नोकरी करण्याची इच्छा असल्यास आपल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या पात्रतेनुसार आपल्याला भारतामध्ये किंवा परदेशामध्ये योग्य मोबदल्याची नोकरी मिळणार आहे किंवा नाही याचा विचार करणेही आवश्यक आहे. प्रतिष्ठित विद्यापीठांमधून पदव्युत्तर शिक्षण घेऊनही परदेशामध्ये किंवा मायदेशामध्येही मनासारखी आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी न मिळण्याची शक्यताही असतेच. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी कोर्सची निवड करताना त्या विद्यापीठातून केलेला कोर्स परदेशात आणि मायदेशातही मान्यताप्राप्त असल्याची खात्री करून घेतलेली असावी. परदेशामध्ये शिक्षणासाठी जाताना तिथे आपले परिचित, किंवा नातेवाईक असल्यास त्यांच्या मार्फत त्या ठिकाणच्या जीवनशैली, रीतीरिवाज यांच्याबद्दल जुजबी माहिती आधीपासूनच करून घेतलेली असावी.

Leave a Comment