भारतामध्ये एक नाही तर अनेक आहेत ताजमहाल!


भारतामध्ये आग्रा येथे असणारा ताजमहाल मुघल सम्राट शाहजहान याने त्याची प्रिय पत्नी मुमताज महल हिचे स्मारक म्हणून बनवविला. हे स्मारक प्रेमाचे स्मारक समजले जात असून, जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. या वास्तूचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आग्रा येथे येत असतात. पण विशेष गोष्ट अशी की भारतामध्ये प्रती-ताजमहाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखीही वास्तू आहेत. या वास्तू आग्र्यातील ताजमहालाशी पुष्कळ प्रमाणात मिळत्या-जुळत्या असल्याने स्थानिक नागरिक या वास्तूंना प्रती-ताजमहाल म्हणूनच ओळखतात. या वास्तू कोणत्या आणि त्या कुठे आहेत हे जाणून घेऊ या. आग्र्यातील ताजमहाल आणि इतर ठिकाणी असलेले प्रती-ताजमहाल यांच्यामध्ये सर्वात मोठे साधर्म्य हे, की या सर्वच वास्तू कोणाच्या ना कोणाच्या स्मरणार्थ बनविण्यात आलेली समाधीस्थळे आहेत.

ताजमहालाची हुबेहूब प्रतिकृती असेलला ‘बीबी का मकबरा’ महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहे. या समाधीस्थळाचा उल्लेख ‘दख्खनचा ताजमहाल’ म्हणून करण्यात येत असतो. ‘बीबी का मकबरा’ ताजमहालाची हुबेहून प्रतीकृती असून याचे निर्माण १६६० साली करविण्यात आले. औरंगाबाद येथे येणारे पर्यटक हे संगमरवरी समाधीस्थळ पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. दिल्ली येथे हुमायूनच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी बागा बेगम यांनी बनवविलेला ‘हुमायून का मकबरा’ हा देखील ताजमहालाप्रमाणेच भव्य आणि सुंदर आहे. संगमरवर आणि सँडस्टोन वापरून या समाधीस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या समाधीस्थळाच्या अवतीभवती अतिशय सुंदर बगीचे आहेत.

जुनागढ येथे असलेला ‘महाबत का मकबरा’ हे स्मारकही ताजमहालाशी मिळते-जुळते आहे. मात्र ताजमहालावर ज्याप्रमाणे मुघलकालीन वास्तूकलेची छाप आहे, तशी छाप या स्मारकावर नसून, याच्या वास्तुकलेवर युरोपियन प्रभाव पाहण्यास मिळतो. हे स्मारक १८५०च्या दरम्यान जुनागढच्या नवाबांनी बनवविले होते. या स्मारकाच्या परिसरामध्ये इतर अनेक लहान-मोठी स्मारके आहेत. ताजमहालापासून प्रेरणा घेत डच सैन्याधिकारी जॉन विलियम हेसिंग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी अॅन हेसिंग यांनी आग्रा येथेच ‘लाल ताजमहाल’ बनवविला. ही वस्तू ताजमहालाची प्रतिकृती असून, ताजमहालाच्या मानाने आकाराने पुष्कळ लहान आहे. लाल रंगाच्या पाषाणाचा वापर करून हे ऐतिहासिक स्मारक बनविले गेले आहे.

Leave a Comment