उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्याकडून चारा घोटाळ्यातील नवा खुलासा


पटना – चारा घोटाळा यावेळेस पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागे म्हशींची शिंग कारण आहे. नुकताच चारा घोटाळ्यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा बिहार सरकारने केला आहे. तत्कालीन सरकारने म्हशींची शिंग चमकवण्यासाठी चक्क १६ लाख रुपये खर्च केल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारने सन १९९०-९१ ते १९९५-९६ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये १६ लाख रुपयांचे मोहरीचे तेल खरेदी केल्याची माहिती सरकारने दिली आहे. राष्ट्रीय जनता दलचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव सध्या चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगामध्ये असतानाच हा खुलासा सरकारने केला आहे.

बिहार विनियोग प्राधिकरण खर्च विधेयक २०१९ बिहारच्या विधानसभेमध्ये सादर करण्यात आले. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी हे विधेयक सादर करताना चारा घोटाळ्यासंदर्भातील हा महत्वाचा खुलासा केला. हे विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत १९७७-७८ पासून २०१५-१६ पर्यंत करण्यात आलेल्या प्राधिकरण खर्चाचा हिशेब करण्यासाठी आणि खर्च निश्चिती करण्यासाठी सादर करण्यात आले. एखाद्या योजनेवर सामान्यपणे जादा खर्च होत असल्यास सरकार तो अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मंजूर करुन घेते. पण हा नियम लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पाळला नाही. खोट्या बिलांच्या माध्यमातून त्यावेळी पैश्यांवर डल्ला मारण्यासाठी सरकारी तिजोरीतून पैसे काढण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

Leave a Comment