पाकिस्तानी शेअर बाजारात दाऊदचा पैसा!


कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमला भारताने भलेही मोस्ट वाँटेड म्हणून जाहीर केले असेल, अमेरिकेने भलेही त्याला दहशतवादी म्हणून जाहीर केले असेल किंवा जगभरात भलेही त्याच्या टोळीची संपत्ती जप्त करण्यात आली असेल. मात्र दाऊदच्या डी कंपनीने संघटीत गुन्ह्याच्या माध्यमातून जमवलेला पैसा आजही शेअर बाजारात खेळत आहे. दाऊदने हा पैसा मादक पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी, बनावट नोटांच्या टोळ्या आणि खंडणी वसूलीतून कमावला आहे. पाकिस्तानी शेअर बाजारात दाऊदच्या या गुंतवणुकीचा पुरावा भारतीय तपास यंत्रणा जमा करत आहेत.

लंडनच्या तुरुंगात असलेला डी-कंपनीचा संदिग्ध आरोपी जाबिर मोती हा जवळपास पाच प्रतिभूति कंपन्या चालवतो. या सर्व कंपन्या कराची स्टॉक एक्सचेंजमधून चालतात. या शेअर बाजाराचे 2016 मध्ये पाकिस्तानी शेअर बाजारात विलीनीकरण झाले होते. जाबिर मोती याच्या व्यतिरिक्तही दाऊद अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हबीब मेट्रोपॉलिटन फायनान्शियल सर्विसेज (एचएमएफएस) या इक्विटी कंपनीत गुंतवणूक करत आहे. ही कंपनी हबीब बँकेची सहयोगी आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू, हबीब बँकेचा माजी उपाध्यक्ष आणि दाऊदचा व्याही जावेद मियांदाद याने या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दाऊदचा परिचय करून दिला, असे गुप्तचरांच्या अहवालात म्हटले आहे. जावेद मियांदादचा मुलगा दाऊदची मुलगी मेहरीन इब्राहिमचा नवरा आहे. याच हबीब बँकेवर अमेरिकेच्या वित्तीय सेवा विभागाने 2017 मध्ये हवाला व्यवहार तसेच दहशतवादाशी संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. हबीब बँकेवर नेपाळमध्ये डी-कंपनीच्या कामात सहकार्य करण्याचाही संशय आहे.

जाबिर मोती हा डी-कंपनीचा कुख्यात सदस्य आहे. त्याचा एक नातेवाईक जफर मोती हा पूर्वी कराची स्टॉक एक्सचेंजचा संचालक होता. त्यातूनच 2012 मध्ये दाऊद इब्राहिम व जफर मोतीची ओळख झाली. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या पहिल्या मजल्यावर खोली क्र. 54-55 मध्ये जफर मोती कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचा जाबिर मोती हा संचालक आहे. या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी जफर मोती आहे आणि तो अन्य काही कंपन्याही चालवतो. बीआरपी-एमएसी सिक्युरिटीज प्रायव्हेट लि. या आणखी एका कंपनीची मालक जफरची पत्नी अफसान मोती असल्याचे म्हटले जाते आणि ही कंपनी कराचीतील दाऊदच्या कथित अड्ड्यापासून जवळच आहे.

दाऊदने पाकिस्तानी शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशांचा पुरावा मिळाला, तर पाकिस्तानचे दहशतवादाबाबत दुटप्पी धोरण आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआयचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी असलेले संबंध उघडे करण्यास मदत होईल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे आयएएनएस वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या जाबिर मोतीला एफबीआयने दिलेल्या सूचनेवरून स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ऑगस्ट 2018 मध्ये लंडनमधील एका हॉटेलमध्ये अटक केली होती. डी-कंपनीने मादक पदार्थांच्या तस्करीतून कमावलेला पैसा एफबीआयने जप्त केला होता. सध्या जाबिर मोतीवर लंडनमधील न्यायालयात प्रत्यर्पणाचा खटला सुरू असून त्याला अमेरिकेच्या हवाली करावे, अशी एफबीआयची मागणी आहे. वेस्टमिन्स्टर येथील न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यावर भारतीय सुरक्षा संस्थांचीही नजर आहे. “पाकिस्तानी नागरिक असलेला जाबिर हा डी-कंपनीत वरच्या वर्तुळात वावरतो आणि तो थेट दाऊद इब्राहिमला रिपोर्ट करतो. मादक पदार्थांची तस्करीचा आरोप असलेल्या जाबिरने डी-कंपनीच्या वतीने 14 लाख डॉलरचा अपहार केल्याचा आरोप आहे,” असे एफबीआयने लंडनच्या न्यायालयात म्हटले आहे.

जाबिर मोतीच्या प्रत्यर्पणासाठी एफबीआय प्रयत्न करत असतानाच हा खटला अयशस्वी ठरावा यासाठी लंडनमधील पाकिस्तानी उच्चायोग धडपड करत आहे. जाबिर मोतीवर अमेरिकेत खटला चालला तर पाकिस्तानी शेअर बाजारातील दाऊदच्या सहभागाचे सज्जड पुरावे अमेरिकेच्या हाती लागतील, ही भीती सध्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना भेडसावत आहे.

दाऊदने भारतात गुन्हेगारी धंद्यातून प्रचंड पैसा कमविला आहे. दाऊदने हा काळा पैसा भारतासह, पाकिस्तान आणि दुबईमधील बांधकाम व्यवसायात गुंतविला आहे. इतकेच नाही तर कराची आणि मुंबईच्या शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या नावे दाऊदची गुंतवणूक असल्याचे मानले जाते. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ तयार करून विकण्याचाही त्याचा व्यवसाय आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानातील कापड गिरण्यांवरंही दाऊदचे वर्चस्व आहे.

Leave a Comment