आजीच्या मार्गावर प्रियंका गांधी


काँग्रेसमुक्त भारत ही पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आवडती कल्पना. त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी मिळून ही कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणलीही आहे. मात्र काँग्रेसचा पाठिराखा असणारा वर्गही देशात थोडा-थोडका नाही. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही कोणत्याही पक्षापासून मुक्त देश ही संघाची कल्पना नसल्याचे एकदा जाहीररीत्या सांगितले होते.

काँग्रेसचा इतिहास ही वेगळी गोष्ट आहे, मात्र काँग्रेस शिवाय भारताची कल्पना करणेही कठीण आहे. मात्र आजच्या घडीला देशात काँग्रेसचा जेवढा संकोच झाला आहे, तेवढा यापूर्वी कधीही झाला नव्हता हेही नाकारण्यात अर्थ नाही. संसदेत काही काँग्रेसी सदस्यांचा अपवाद वगळला तर या पक्षाचा आवाज अन्यत्र कुठे ऐकूही येईनासा झाला आहे. सध्या काँग्रेस पक्ष एका मोठ्या संकटातून जात आहे, हे आता जगजाहीर झाले आहे. या परिस्थितीत काँग्रेसचे पुनर्जीवन कसे होईल, हा प्रश्न केवळ काँग्रेसजनांनाच नव्हे तर सर्वच भारतीयांना पडला आहे.

हा एक कठीण प्रश्न आहे, त्याचे स्पष्ट उत्तर कदाचित कोणाकडेही नाही. काँग्रेसच्या या सर्वात कठीण परिस्थितीत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे ज्या प्रकारे योगी सरकारला झुकण्यासाठी मजबूर केले त्यावरून काँग्रेसच्या पुनर्जीवनाच्या काही आशा निर्माण झाल्या आहेत. आतापर्यंत आजी इंदिरा गांधी यांच्याशी केवळ दिसण्यात साधर्म्य असलेल्या प्रियंका यांनी इंदिराजींच्या मार्गावरूनच वाटचाल सुरू केल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.

प्रियंका यांनी चुनारमध्ये जे केले ते त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी 1978 ते 80 दरम्यान केले होते. इंदिराजींचे प्रशसंक आणि टीकाकार साधारणपणे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचे कौतुक करतात किंवा त्यावर टीका करतात. मात्र इंदिरा गांधी या देशातील कदाचित सर्वात मोठ्या विरोधी पक्षनेत्या होत्या, हे विसरता येणार नाही.

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसची केवळ निवडणुकीत मात झाली नव्हती, तरी आणीबाणीमुळे जवळपास संपूर्ण देशात काँग्रेसचे नाव हे पापाचे पर्याय बनले होते. खुद्द इंदिराजींची प्रतिष्ठा मातीमोल झाली होती. काँग्रेस किंवा इंदिरा गांधी चटकन आपल्या पायावर उभ्या राहू शकतील, हे तेव्हा काँग्रेसजनांनाही वाटत नव्हते. मात्र केवळ तीन वर्षांच्या आत इंदिराजींनी मोरारजी देसाईंच्या नेतृत्वात बनलेल्या जनता पक्षाच्या सरकारला परास्त केले. इतकेच नाही तर जनता पक्ष तोडून त्याचे अस्तित्वही संकटात आणले. त्यानंतर 1978 मध्ये काँग्रेसला उभारी देऊन त्या 1980 च्या शेवटी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या.

इंदिराजींनी 1980 मध्ये पुन्हा पंतप्रधान होऊन नवा इतिहास रचला होता. हा करिष्मा त्यांनी केला कसा? याचे उत्तर त्यांच्या धोरणीपणात आहे. इंदिराजी 1977 ची निवडणूक हरल्यानंतर काही दिवस गप्प बसल्या. मात्र 1978 मध्ये उत्तर व पूर्व भारतात महापूर आला. आज उत्तराखंडमध्ये असलेल्या भागापासून उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि आसामला या महापुराने वेढले होते. देशात हाहाकार माजला होता. जनतेच्या याच समस्येच्या काळात इंदिराजी त्यांच्यात गेल्या. गावोगावी, शहरोशहरी पूरग्रस्त लोकांशी त्यांनी संपर्क साधला. बेलछी गावात दलितांच्या हत्येची घटना असो किंवा जनतेशी संबंधित मुद्द्यावरील आंदोलन असो, इंदिराजी सर्व ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहत. गंमत म्हणजे चिकमंगलुरू येथून निवडणूक जिंकल्यानंतर त्या केवळ शपथ घेण्यापुरत्या संसदेत गेल्या. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांचा जास्तीत जास्त काळ जनतेतच गेला. परिणाम हा झाला, की 1980 च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या.

विरोधी बाकांवर असताना इंदिराजींनी संसद किंवा दिल्लीतील राजकारण सोडून जनतेच्या मध्यात वेळ घालवणे पसंत केले. जिथे अन्याय किंवा समस्या दिसेल तेथे इंदिराजी जात. आज प्रियंकांनी सोनभद्र प्रकरणी तीच पद्धत अंगीकारली आहे. वास्तविक हे दोन गटांतील भांडण, परंतु त्याला जनआंदोलनाचे स्वरूप देऊन त्या स्वतः तेथे दाखल झाल्या. इतकेच नव्हे तर सोनभद्रला जाताना राज्य सरकारने त्यांना रोखणे तेव्हा हिंमत असेल तर अटक करा, असे आव्हान दिले. त्यामुळे सरकारला बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. प्रियंका यांच्या या छोट्याशा विजयामुळे काँग्रेसजनांच्या आशा पल्लवित झाल्या नसल्या तरच नवल!

Leave a Comment