आंदोलकांच्या विरुद्ध गँगस्टर – चीनची नवी चाल


हाँगकाँग हा चीनच्या सत्तेखालील प्रदेश असला तरी तेथे बऱ्यापैकी स्वायत्तता आहे. त्या बोलीवरच ब्रिटिशांकडून हे बेट चीनला 1997 साली देण्यात आले होते. मात्र याच हाँगकाँगमध्ये आपली कम्युनिस्ट राजवट लादण्याचा प्रयत्न चीनचे सत्ताधारी करत आहेत. त्याला तेथील तरुणांचा सक्त विरोध असून हा विरोध रस्त्यांवरील निदर्शनांच्या रूपाने बाहेर पडत आहे. हा विरोध चिरडून टाकणे शक्य न झाल्यामुळे चीनने आता एक नवाच मार्ग पत्करला असून त्याने या आंदोलकांविरुद्ध गँगस्टरना उतरवले आहे.

हाँगकाँगमध्ये लोकशाहीची मागणी करणाऱ्या निदर्शकांवर गेल्या सोमवारी मोठे हल्ले झाले. हे निदर्शक काळे टी-शर्ट घालून शांततेने निदर्शने करत होते. त्यावेळी सुमारे 100 जण पांढऱ्या टी-शर्टमध्ये आणि हातात काठी घेऊन तिथे आले व त्यांनी निदर्शकांवर हल्ला चढवला. त्या हल्ल्यांमध्ये कित्येक डझन नागरिक जखमी झाले. हे हल्ले ट्रियाड गँगच्या सदस्यांनी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे निदर्शकांच्या संतापात भरच पडली आहे.

या हिंसाचारात लाम चेऊक-तिंग नावाचे एक विधिमंडळ सदस्यही जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि हाताला जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यामागे ट्रियाड गँगच असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. “त्यांच्या बर्बर आणि हिंसक कृत्यांमुळे हाँगकाँगच्या नागरी समाजाला डाग लागला आहे,” असे ते म्हणाले. यानंतर लोकशाहीवादी विधिमंडळ सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन चीन सरकारवर तोंडसुख घेतले. “ट्रियाड गँग हाँगकाँगच्या लोकांना ठोकून काढत आहेत आणि तुम्ही काहीही घडत नसल्यासारखे दाखवत आहात,” अशी टीका त्यांनी केली.

“हे लोक कोण होते आणि त्यांना कोणी बोलावले होते, हे कोणीही सांगत नाही. हा अगदी ठरवून केलेला हल्ला होता,” असे चीन विषयक तज्ञ मायकेल डिल्लाँ यांचे म्हणणे आहे.

या हिंसाचाराच्या विरोधातसुद्धा निदर्शकांनी शनिवारी मोर्चा काढला तर त्यातही हिंसाचार झाला. पोलिस आणि निदर्शकांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनीच या टोळ्यांना मदत केल्याचा निदर्शकांनी आरोप केला.

ट्रायड हे चीनमधील गुन्हेगारी टोळ्यांचे एकत्रित नाव असून या टोळ्या विविध देशांत कार्यरत आहेत. चीन , हाँगकाँग , मकाऊ आणि तैवान हे देश त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र असून अमेरिका, कॅनडा, व्हिएतनाम, कोरिया, जपान, सिंगापूर, फिलीपाईन्स, इंडोनेशिया, मलेशिया, थायलँड, ब्रिटन, बेल्जियम, इटाली, नेदरलँड्स, फ्रान्स, स्पेन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि न्यूझीलंड या देशांमध्ये त्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे.

मात्र हाँगकाँगमध्ये या टोळ्या जास्त सक्रिय असून चीनच्या मुख्य भूमीच्या गुन्हेगारी संघटनांपेक्षा त्या वेगळ्या आहेत. या ट्रायड पारंपरिक गुन्हेगारी कारवायांमध्ये कमी गुंतल्या असून पांढरपेशा गुन्ह्यांमध्ये त्यांचा जास्त सहभाग असतो. 14 के, सन ये ऑन, ताई हुआन चाई, वॉ शिंग वो, शुई फोंग, वॉ हॉप टू आणि लुएन ग्रुप या हाँगकाँगमधील सर्वात शक्तिशाली ट्रायड टोळ्या आहेत. या टोळ्या चीनच्या बाजूने असल्याचे साधारणपणे मानले जाते. हाँगकाँगमध्ये जे काही घडत आहे ते चीनविरोधी असल्याचे त्यांना पटवून दिले तर त्यांना चीनविरोधी निदर्शकांच्या विरोधात वापरता येऊ शकते, असे डिल्लाँ म्हणतात.

ट्रियाड गँग आणि चीनचे सत्ताधारी यांचे घनिष्ट संबंध असल्याचे म्हटले जाते. “ट्रियाड गँगचे सदस्य जोपर्यंत देशभक्त आहेत, हाँगकाँगच्या समृद्धी व स्थैर्याची त्यांना जोपर्यंत चिंता राहील तोपर्यंत त्यांच्य़ाशी आपण जमवून घेतले पाहिजे,” असे चीनचे तत्कालीन पोलिस मंत्री ताओ सिजू यांनी 1993 मध्ये एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. इतकेच नव्हे तर चीनच्या सार्वजनिक सुरक्षा संस्थांचे समाजातील वेगवेगळ्या घटकांशी दाट संबंध आहेत आणि त्यात या गँगचाही समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. एका चिनी नेत्याच्या परदेश दौऱ्यावर त्या नेत्याला चिनी सुरक्षा सैनिकांसह ट्रियाड गँगच्या 800 सदस्यांनीही सुरक्षा पुरविली होती, अशी कबुलीही त्यांनी दिली होती.

तिआनमेन चौकात 1989 साली झालेली निदर्शने चीनने रणगाड्यांच्या साहाय्याने चिरडून टाकली होती. मात्र आता 2019 मध्ये तसे करणे शक्य नाही. म्हणून अशा पद्धतीने आडवळणाने लोकशाहीवादी आंदोलकांना चिरडण्याचा पवित्रा चीनने घेतला आहे. कम्युनिस्ट चीन किती कुटिल पातळीवर उतरू शकतो याची चुणूकच त्यातून मिळते.

Leave a Comment