पाऊस पडावा म्हणून लावले गाढवांचे लग्न !


धूमधडाक्याने वाजत गाजत आलेली वरात, बँड बाजा, फटाक्यांचा कडकडाट, आणि उत्साहाने वरातीमध्ये सहभागी झालेली वराती मंडळी… हे दृश्य कोणत्याही लग्नमंडपात शोभण्यासारखेच आहे. मात्र या लग्नामध्ये वर-वधू चक्क गाढवे आणि गाढवीणी होत्या.. ! ही हकीकत तेलंगाना राज्यातील बोवनपल्ली गावामधील नल्ला पोचम्मा मंदिरातली आहे. येथे तीन दिवस आधी पार पडलेल्या या अजब विवाहसोहळ्यामध्ये गाढवांचा विवाह, मोठ्या थाटामाटात, हिंदू विधींच्या अनुसार पार पडला. हा विवाह सोहळा आयोजित केला जाण्यामागे कारण काहीसे अजबच म्हणायला हवे.

मान्सूनने आता सर्व भारत व्यापला असून, देशामध्ये बहुतेक सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. मात्र तेलंगाना राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हुलकावणी दिली असून, येथील नागरिक अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पाऊस पडावा आणि दुष्काळ परिस्थिती दूर व्हावी या करिता नागरिक निरनिराळे उपाय आजमावत आहेत. देवधर्म, यज्ञ-याग सर्व काही करून झाले आहे, तरी पावसाने मात्र अद्याप येथे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आता गावातील वडीलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्याने ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लाऊन देण्याचा उपाय योजला. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी हा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. या पूर्वीही असा उपाय अवलंबला गेल्यानंतर गावामध्ये भरपूर पाऊस झाला असल्याने यंदाही या विवाहसोहळ्यानंतर गावामध्ये भरपूर पाऊस पडेल अशी आशा ग्रामस्थांना वाटत आहे. हा उपाय केल्याच्या एका आठवड्याच्या आत या परिसरामध्ये चांगला पाऊस होईल अशी आशा ग्रामस्थांना वाटत आहे.

Leave a Comment