इंग्लंडमध्ये पार पडल्या जागतिक पातळीवरील गोगलगाईंच्या शर्यती !


आजकाल अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन जागतिक पातळीवर केले जात असते. धावणे, सायकलिंग, पोहोणे, फुटबॉल, क्रिकेट, बेसबॉल आणि अश्याच किती तरी खेळांच्या स्पर्धा नियमितपणे अनेक देशांमध्ये आयोजित होत असतात, आणि त्यामध्ये अनेक देशांतील गुणवंत खेळाडू सहभागीही होत असतात, कारण जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी होणे ही कोणत्याही खेळाडूसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. अलीकडेच इंग्लंड मध्येही जागतिक पातळीवरील स्पर्धा पार पडली, ती मात्र हटके म्हणावी लागेल. ही स्पर्धा होती ‘वर्ल्ड स्नेल रेसिंग चँपियनशिप्स’साठीची ! या स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर गोगलगायींची शर्यत आयोजित केली गेली होती. ही स्पर्धा दरवर्षी इंग्लंडमधील नॉरफोक इथे आयोजित केली जात असून, यंदाच्या वर्षी जगभरातून एकशे साठ गोगलगायी या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

या शर्यतीमध्ये स्पर्धक स्वतःच्या पाळीव गोगलगायींसह सहभागी होतात. ज्यांच्याकडे गोगलगाय नसतानाही स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची त्यांची इच्छा असल्यास आयोजकांच्या संग्रही असलेल्या अनेक गोगलगायींच्या पैकी एकीची निवड करून स्पर्धेमध्ये सहभागी होता येते. या शर्यतींमध्ये अनेक प्राथमिक फेऱ्या आयोजित केल्या जातात, आणि प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजयी झालेल्या सर्व गोगलगायींमध्ये अंतिम शर्यत होत असते. यंदाच्या वर्षी व्यवसायाने प्राध्यापिका असलेली ब्रिटीश महिला मारिया वेल्बी हिच्या सॅमी नामक गोगलगाईने जागतिक खिताब जिंकला आहे.

मारियाने आयोजकांच्या संग्रही असलेल्या गोगलगाईंमधून सॅमिची निवड केली असून, त्याला पाहताक्षणीच त्याच्यात शर्यत जिंकण्याच क्षमता असल्याची खात्री आपल्याला पटली असल्याचे मारिया म्हणते. इतर स्पर्धकांना आपली गोगोलगाय शर्यत जिंकू न शकल्याने काहीशी खंत वाटत असून, पुढील शर्यतीसाठी अधिक मोठ्या आकाराच्या, आणि बळकट स्नायू असलेल्या गोगलगाई निवडण्याचा मनोमन निर्धारही या स्पर्धकांनी केला असल्याचे पहावयास मिळत असल्याचे वृत्त ‘इनसाईड एडिशन’ द्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment