लंडनमध्ये आता वाचनप्रेमींसाठी लघुकथा पुरविणारी ‘व्हेंडिंग मशीन्स’


लंडन हे केवळ युरोपमधीलच नाही, तर सर्व जगामध्ये सर्वाधिक व्यस्त शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. लंडनमध्ये राहणारे नागरिक आपापल्या कामांमध्ये इतके गुंतून पडलेले असतात, की त्यांची आवडीची पुस्तके वाचण्यासाठी त्यांना फुरसत अशी मिळतच नाही. पण केवळ पुस्तके आणण्यासाठी आणि आणलेली पुस्तके वाचण्यासाठी वेळ नाही या कारणास्तव लोकांना आपली वाचनाची आवड त्यागावी लागून नये आणि पुस्तकांशी असलेली त्यांची मैत्री कायम टिकून राहावी यासाठी लंडन शहरातील ‘कॅनरी व्हॉर्फ’ येथे पुस्तकप्रेमींसाठी लघुकथा पुरविणारी ‘व्हेंडिंग मशीन्स’ उपलब्ध करविण्यात आली आहेत. या व्हेंडिंग मशीन्सच्या द्वारे एक, तीन आणि पाच मिनिटांमध्ये वाचून होणाऱ्या लघुकथा वाचकांसाठी पुरविण्यात येत असून, व्हर्जिनिया वूल्फ पासून चार्ल्स डिकन्स पर्यंत प्रख्यात लेखकांनी लिहिलेल्या लघुकथा या संग्रहामध्ये समाविष्ट असणार आहेत.

आतापर्यंत पाणी, शीतपेये आणि खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू पुरविणारी व्हेंडिंग मशीन्स सर्वांच्या सवयीची झाली असली, तरी लघुकथा पुरविणाऱ्या व्हेंडिंग मशीन्सची संकल्पना एकदम हटके आहे. ही व्हेंडिंग मशीन्स ‘शॉर्ट एडिशन’ नामक फ्रेंच कंपनीच्या वतीने तयार करण्यात आली असून याद्वारे लहान लहान कागदांवर लघुकथा छापल्या जाऊन वाचकांना त्याच्या निवडीप्रमाणे पुरविण्यात येत असतात. लघुकथा छापण्यासाठी वापरण्यात येणारा कागद इको फ्रेंडली ‘पापायरस’ असून, लघुकथा वाचनाची ही सोय वाचकांसाठी मोफत पुरविण्यात येत आहे.

ही व्हेंडिंग मशीन्स उपलब्ध करविली जाण्यापूर्वी केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात सुमारे सत्तर टक्के वाचनप्रेमींनी, केवळ वाचनासाठी आपण वेळ देऊ शकत नसल्याने आणि उपलब्ध असलेल्या वेळामध्ये सोशल मिडीयावर सक्रीय रहात असल्याचे सांगितल्यानंतर पुस्तकप्रेमींना कमीत कमी वेळातही आपल्या आवडत्या लेखकांनी लिहिलेल्या लघुकथा वाचण्याचा आनंद घेता यावा या कारणास्तव ही लघुकथा व्हेंडिंग मशीन्स उपलब्ध करविण्यात आल्याचे सांगून या प्रयोगाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही ‘शॉर्ट एडिशन’च्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment