कमलनाथसमोर कमळ मजबूर?


कर्नाटकात ‘मिशन कमल’ यशस्वी झाल्यामुळे हवेत उडणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पाय मध्य प्रदेशात जमिनीवर आले आहेत. मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांना आपण सहज फोडू, असे मनातले मांडे भाजपची मंडळी खात होती. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर भाजपच्या ‘मिशन कमल’ची डाळ शिजताना दिसत नाही. उलट राज्यात भाजपची खेळी त्याच्यावर उलटल्याचे चित्र आहे. भाजपचे अनेक आमदार पक्षाला रामराम करून काँग्रेसशी घरोबा करण्याचा विचार करत असल्याचे दिसते. बुधवारी तर दोन आमदारांनी चक्क विधानसभेत पक्षाच्या विरोधात जाऊन काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आपल्या आमदारांवर सक्त नजर ठेवण्याची वेळ भाजपवर आली आहे.

कर्नाटकात एकीकडे बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी करत आहेत, दुसरीकडे मध्य प्रदेशात हे नाट्य उलगडत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानेही ही घडामोड गांभीर्याने घेतली आहे. एकीकडे बैठकांची मालिका चालू आहे, तर दुसरीकडे आमदारांवर सक्त पाळत ठेवण्यात येत आहे. काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा संशय असलेल्या आमदारांवर खास नजर ठेवली जात आहे.

राज्याच्या विधानसभेत 230 आमदारांपैकी काँग्रेसकडे 114 आमदार असून चार अपक्ष, बहुजन समाजवादी पक्षाचे दोन आणि समाजवादी पक्षाच्या एका आमदाराचा पाठिंबा सरकारला आहे. भाजपकडे 108 आमदार असून एक जागा रिकामी आहे. मात्र बुधवारी राज्य विधानसभेत दंड कायदा सुधारणा विधेयकावर झालेल्या मत विभागणीत 122 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यात भाजपच्या नारायण त्रिपाठी आणि शरद कोल या दोन दोन आमदारांचा समावेश होता.

यामुळे भाजपमध्ये खळबळ माजणे स्वाभाविक होते, कारण काँग्रेस कमजोर झाल्याचे भाजपचे मत होते. त्याला जोरदार धक्का बसला. फोडाफोडीच्या राजकारणात सध्याच्या घडीला भाजपला तोड नाही. मात्र आपल्याच खेळात काँग्रेस आपल्याला मात देऊल, हे भाजपच्या गावीही नव्हते. म्हणूनच पक्षाने प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांना रातोरात भोपाळला रवाना केले. तसेच माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका मोठ्या नेत्याची बुधवारी भेट घेऊन चर्चा केली. पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा आणि प्रदेश संघटन महामंत्री सुहास भगत यांच्यातही दीर्घकाळ चर्चा झाली.

नारायण त्रिपाठी आणि शरद कोल या दोघांशीही संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्रिपाठी आणि कोल यांनी कमलनाथ सरकारला केवळ पाठिंबाच दिला नाही तर ही आपली घरवापसी असल्याचेही सांगितले. “भाजपमध्ये आमचा छळ सुरू असून आमचे कोणी ऐकत नाही. शिवराजसिंह चौहान यांनी आमच्या मतदारसंघासाठी विकासाच्या अनेक घोषणा केल्या होत्या, मात्र त्यातील एकाचीही अंमलबजावणी झाली नाही. लोकांसमोर आमची मान खाली जात होती, त्यामुळे आम्ही कमलनाथ सरकारला साथ देण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तर भाजप नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आणि आता आमदार असलेल्या संजय पाठक यांच्यावरही भाजप लक्ष ठेवून आहे. अर्थात, वरकरणी भाजपने सगळे आलबेल असल्याचा दावा केला आहे. पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

या सर्व प्रकरणाचा घटनाक्रम पाहण्यासारखा आहे. कर्नाटकात सरकार पडल्यानंतर विरोध पक्षनेते गोपाल भार्गव यांनी एका दिवसात सरकार पाडण्याचे आव्हान दिले. “आमचे नंबर 1 आणि नंबर 2 यांनी आदेश दिला तर हे सरकार एक दिवसही चालणार नाही, असं आव्हानच दिलं होतं,” असे ते म्हणाले होते. चौहान यांनीही आता मध्य प्रदेश सरकारची पाळी असल्याचा दावा केला. त्यावर कमलनाथ यांनी प्रत्यक्ष विधानसभेत मत विभागणी करून आपले बहुमत सिद्ध करण्याचे ठरवले आणि त्यात ते यशस्वीही ठरले.

मध्य प्रदेशच्या राजकारणाच्या जाणकारांनुसार, भाजपमध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवराजसिंह चौहान, गोपाल भार्गव, राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे वेगवेगळे गट तयार झाले आहेत. त्यामुळे विधिमंडळापासून रस्त्यावरच्या लढाईपर्यंत भाजप एकसंघ दिसत नाही. त्याला या घडामोडीमुळे बळच मिळाले आहे.

राज्यात गेल्या वर्षी निवडणुका झाल्या तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तरुण-तडफदार नेत्याला बाजूला सारून काँग्रेसने कमलनाथ यांच्यासारख्या बुजुर्गाला संधी दिली. त्यावेळी अनेकांच्या भुवया वर गेल्या होत्या. मात्र राजकारणातले जुने खेळाडू असलेल्या कमलनाथांनी भाजपचा रथ यशस्वीरीत्या रोखून आपले कौशल्य दाखवून दिले आहे. कमलनाथसमोर कमळ मजबूर झाल्याचे चित्र म्हणूनच मध्य प्रदेशात दिसू लागले आहे.

Leave a Comment