‘चांद्रयान-२’मुळे ऑस्ट्रेलियात गोंधळाचे वातावरण


बावीस जुलै रोजी दुपारी २.४३ या वेळी भारताच्या चांद्रयान-२ ने आकाशामध्ये यशस्वी उड्डाण केले, त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये संध्याकाळचे साडेसात वाजत होते. यानाच्या यशस्वी उड्डाणाचा आनंद भारतभरामध्ये साजरा होत असतानाच ऑस्ट्रेलियातील नॉर्दर्न टेरिटरी आणि क्वीन्सलँड प्रांतांमध्ये मात्र, आकाशामध्ये एक विचित्र, प्रखर प्रकाशाचा गोळा दिसू लागताच काही काळ गोंधळाचे, विस्मयाचे वातावरण होते. शौना रॉईज नामक व्यक्तीने क्वीन्सलँडमधील जुलिया क्रीक कॅरव्हॅन पार्कमधून हा प्रकाश पाहिला, आणि हे काही तरी अजब घडते आहे असे वाटून त्वरित एबीसी नॉर्थवेस्ट फेसबुक पेजवर ही घटना आणि काही छायाचित्रे पोस्ट केली.

व्यवसायाने वकील असणारे शौना त्यावेळी इतर एकशे साठ लोकांसमवेत एका डिनर पार्टीसाठी जुलिया क्रीक कॅरव्हॅन पार्क येथे आले होते. त्यावेळी आकाशामध्ये हा प्रखर आणि वेगाने हालणारा प्रकाश पाहून सर्वांनाच विस्मय वाटला. हा प्रकाशाचा गोळा उत्तर-पूर्वेच्या दिशेने हालताना दिसला असून, सुमारे तीन ते चार मिनिटांमध्ये हा प्रकाश नष्ट झाला असल्याचे शौना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. त्याच पार्टीमध्ये उपस्थित असणाऱ्या जेकब ब्लंट नामक व्यक्तीने या प्रकाशाच्या गोळ्याचे आपल्या मोबाईल फोनवर चित्रण करीत हे नक्की युएफओ असल्याचे ठामपणे म्हटले. मात्र आपल्याला युएफओ दिसले असल्याचे ज्यांनी खात्रीपूर्वक सांगितले, त्यांचा गैरसमज झाला असून, हा प्रकाशाचा झोत इतर ग्रहावरील यान नसून, भारतातून चंद्राच्या दिशेने झेपावलेले चांद्रयान -२ असल्याचा खुलासा झाला आणि आपण पाहिले ते युएफओ होते की नव्हते, या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

भारत आणि सिडनी यांमधला ‘टाईम डिफरन्स’ पाच तासांचा असून, ज्यावेळी भारतातून चांद्रयान-२ ने उड्डाण केले, त्यावेळी भारतामध्ये २.४३, तर ऑस्ट्रेलियामध्ये संध्याकाळचे साडेसात वाजत होते. चांद्रयान-२ च्या उड्डाणाची मिशन अवघ्या सोळा मिनिटांत पूर्ण झाली, म्हणजेच तेवढ्या वेळामध्ये चांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा ओलांडली होती. त्यानंतर दिसत असलेल्या यानाच्या ‘लाईव्ह फीड’च्या अनुसार चांद्रयान-२ चा प्रवास दक्षिणेकडे सुरु झाला असून, या फीडमध्ये श्रीलंकेची सीमा स्पष्ट दिसते. त्यामुळे चांद्रयान-२ चा प्रवास दक्षिणी ‘हेमिस्फीयर’ मधून झाला असून, ऑस्ट्रेलियामधूनही चांद्रयान-२ पाहिले गेले असण्याची शक्यता मोठी असल्याचे मत खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांनी आकाशामध्ये पाहिलेला प्रकाशाचा गोळा, युएफओ नसून, भारताची चंद्राच्या दिशेने यशस्वी भरारी असल्याचे निदान वैज्ञानिकांनी केले असल्याचे समजते.

Leave a Comment