जाणून घेऊ या ‘दिल चाहता है’शी निगडित काही रोचक तथ्ये


‘दिल चाहता है’ हा अतिशय गाजलेला चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतीच अठरा वर्षे पूर्ण झाली. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आमिर खान, सैफ अली झान, अक्षय खन्ना, प्रीती झिंटा, डिम्पल कपाडिया आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. तीन जीवाभावाचे मित्र आणि कालांतराने त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या, त्याचे संपूर्ण विश्व बदलून टाकणाऱ्या घटना आणि त्यामुळे एकमेकांशी आणखी घट्ट झालेले मैत्रीचे नाते सांगणारी या चित्रपटाची कथा होती. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये ताज्या आहेत. त्या काळामध्ये आगळे वेगळे, हटके कथानक असलेला हा चित्रपट आजही मनाची मरगळ दूर करणारा, आणि सर्वांना आपापल्या भावविश्वामध्ये घेऊन जाणारा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने या चित्रपटाशी निगडित काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.

या चित्रपटाचे नायक असलेले आमिर आणि सैफ या चित्रपटासाठी फरहानची पहिली पसंती नव्हते. वास्तविक फरहानला या चित्रपटामध्ये अक्षयच्या सोबत हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांनी भूमिका कराव्यात असे वाटत होते. मात्र हृतिक आणि अभिषेक यांच्या चित्रीकरणाच्या तारखा इतर चित्रपटांसाठी आधीपासूनच आरक्षित असल्याने ते दोघेही या चित्रपटासाठी वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे फरहानने आमिरला भूमिका देण्याचे ठरविले. मात्र आमिर आणि फरहानची प्रथम गाठभेट होण्यातच दहा महिन्यांचा अवधी निघून गेला होता. त्यानंतर आमिरने भूमिका करण्याची तयारी दर्शविल्यानंतर फरहानने आमिरला ‘आकाश’ची भूमिका देऊ केली. ही भूमिका आधी अक्षय साकरणार होता, मात्र आमिरची या चित्रपटामध्ये एन्ट्री झाल्यानंतर ‘आकाश’ची भूमिका आमिरला, तर अक्षयला ‘सिद्धार्थ’ची भूमिका देण्यात आली.

फरहान आणि प्रीती झिंटाची प्रथम भेट मुंबईमध्ये झाली. त्यावेळी प्रीती झिंटा ‘क्या कहना’ चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट देण्यासाठी आली होती. त्यावेळी आपण जेव्हा केव्हा एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन करू, तेव्हा त्या चित्रपटामध्ये प्रीतीला भूमिका देण्याचे आश्वासन फरहानने प्रीतीला दिले होते. फरहानने ‘दिल चाहता है’ चित्रपटामध्ये प्रीतीला भूमिका देऊन आपला शब्द पाळला. या चित्रपटामध्ये ‘आकाश’ (आमिर) आणि ‘शालिनी’ (प्रीती) यांची प्रेमकहाणी न्यूयॉर्कमध्ये चित्रित व्हायची होती. मात्र त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये हिवाळा असल्याने चित्रपटातील हे सर्व प्रसंग ऑस्ट्रेलियामध्ये चित्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चित्रपटाचे संवाद चित्रीकरणाच्या वेळीच रेकॉर्ड व्हायचे असून, त्यामुळे चित्रपटासाठी पुन्हा एकदा डबिंग करण्याची आवश्यकता भासणार नव्हती. पण या कारणामुळे सैफ अली खानने मात्र या चित्रपटामध्ये भूमिका न करण्याचा निर्णय जवळ जवळ पक्का केला होता. पण त्यानंतर सैफने या चित्रपटामध्ये भूमिका करण्याची तयारी दर्शविली.

या चित्रपटाचे बरेचसे कथानक फरहानच्या स्वतःच्या खासगी आयुध्यावर आधारित आहे, तसेच फरहानच्या जिवलग मित्रांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक धमाल घटनाही अनेक प्रसंगांच्या रूपात चित्रपटामध्ये पहावयास मिळाल्या. ‘वो लडकी है कहाँ’ या गाण्यासाठी सैफला लाल शर्ट आणि पांढरी ट्राऊझर, हा १९८० सालची सुपरहिट फॅशन ट्रेंड लक्षात घेऊन, त्याप्रमाणे पोशाख देण्यात आला होता. फॅशनची उत्तम जाण असलेल्या सैफला हा पोशाख सुरुवातीला खटकला असला, तरी त्याने हा पोशाख परिधान करण्यास आढेवेढे घेतले नाहीत. मात्र पायांमध्ये जेव्हा पांढऱ्या रंगाचे बूट परिधान करण्यास सैफला सांगितले गेले, तेव्हा मात्र सैफने साफ नकार दिला होता!

Leave a Comment