बोरिस जॉन्सन – पुढचे डोनाल्ड ट्रम्प?


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुक्ताफळे आणि उपद्व्याप यांची जगाला आता पुरती ओळख पटली आहे. अमेरिकेपासून अटलांटिक महासागराने वेगळे केलेल्या युरोपातही आता ट्रम्प यांची आवृत्ती आली आहे. ब्रिटनमधील कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. सासुरवाडीमार्फत कधी काळी भारताशी संबंध असलेले बोरिस जॉन्सन हे पुढचे डोनाल्ड ट्रम्प म्हणून ओळखले जाण्यासाठी पूर्ण पात्र आहेत.

बहादुरीचा देखावा करणे, बढाया मारणे, लॅटिनमध्ये टोमणे मारणे तसेच अस्तव्यस्त असलेल्या पिवळ्या केसांसाठी बोरिस यांची ओळख आहे. ट्रम्प यांच्याशी अनेकांनी त्यांची तुलना केली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनीही बोरिस यांच्या बाजूने आपले मत व्यक्त केले आहे. “ते (ब्रिटिश लोक) त्यांना ब्रिटनचे ट्रम्प म्हणतात. लोक जेव्हा असे म्हणतात तेव्हा चांगलेच म्हणायला पाहिजे! तेथेही मी लोकामध्ये प्रिय आणि प्रसिद्ध आहे. त्यांना ट्रम्प हवा आहे आणि त्यांना ट्रम्पची गरजही आहे,” असे ट्रम्प यांनी गेल्या मंगळवारी बोरिस यांच्याविषयी लिहिले होते.

अर्थहीन बकवास आणि तर्क नसलेले युक्तिवाद करण्याला माणसाचे गुण म्हणायचे असतील तर बोरिस जॉन्सन यांची गणना बोटांवर मोजता येतील असा विद्वानांमध्ये होऊ शकते, असे एका अमेरिकी वृत्तपत्राने म्हटले आहे. जबाबदारीची जाणीव नसलेला माणूस जो बालिशपणा करतो अशा जवळपास सर्व ‘उद्योगां’ची यादी बोरिस जॉन्सन यांच्या नावावर आहे, असे याच वृत्तपत्राने म्हटले आहे. बोरिस यांनी हे नसते उद्योग केवळ तारुण्यातच केले असे नव्हे तर अगदी परिपक्व वयातही त्यांनी ते केले. अगदी प्रौढ वयातही वन-फोर्थ पँट घालून पळायला जाणे, फाटके कपडे घालून फिरणे,उंच दोरीवरून लोंबकळणे अशा त्यांच्या अनेक कृत्यांबद्दल इंग्लंडवासी तोंड भरून बोलतात.

जॉन्सन आता ब्रिटिश पंतप्रधानांच्या ‘10 डाउनिंग स्ट्रीट’ येथील निवासस्थानी राहायला जातील तेव्हा त्यांच्यासोबत पहिल्या पत्नीपासून झालेली चार अपत्ये आणि त्यांचे संबंध असलेल्या महिलांपासून झालेली अनेक मुले असतील. जॉन्सन यांचे पहिले लग्न अॅलेग्रा मोस्टीन-ओवेन यांच्याशी 1987 साली झाले. ते 1993 पर्यंत टिकले. त्यानंतर काही आठवड्यांतच त्यांनी मरिना व्हीलर यांच्याशी विवाह केला. या मरिना व्हीलर यांची आई दीप सिंह या मूळ पंजाबी होत्या, हा भारताशी बोरिसना जोडणारा धागा होय. एक प्रकारे बोरिस जॉन्सन भारताचा नातजावई आहे म्हणा ना!

बोरिस यांचे खासगी जीवन जेवढे रंगतदार तेवढेच व्यावसायिक जीवनही. हा माणूस मूळचा पत्रकार. आजही ते वृत्तपत्रांत लेख लिहून मोठी कमाई करतात. मात्र वृत्तपत्रांत लिहितानाही अनेकदा निव्वळ कपोलकल्पना करून बातमीदारी केल्याबद्दल त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यानंतर कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करताना खोटे निवेदन करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. ब्रिटनच्या मावळत्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांना परराष्ट्रमंत्री केले तेव्हा एका युरोपीय नेत्याची प्रतिक्रिया बोलकी होती. “आता तर ड्रॅक्युलाही आरोग्यमंत्री होऊ शकेल, ” असे त्याने म्हटले होते.

बोरिस हे युरोपीय महासंघाचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्याच मुळे कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने पंतप्रधानपदासाठी त्यांना पसंती दिली, असेही म्हटले जाते. परंतु बोरिस हे मूळ युरोपीय महासंघाविरोधी नाहीत. थेरेसा मे यांना विरोध करायचा म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली. याचे कारण म्हणजे थेरेसा मे यांनी पक्ष नेतृत्वाच्या स्पर्धेत बोरिसना धूळ चारली होती. त्यानंतर त्यांना शांत करण्यासाठीच मे यांनी त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली होती. मात्र ब्रेक्झिटवरून मे यांच्या मवाळ धोरणाचा निषेध करून बोरिस यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. परंतु संसदेत याच विषयावर मतदान झाले तेव्हा त्यांनी मे यांच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. ब्रेक्झिटचे समर्थक असलेले बोरिस आज स्थलांतरितांविरुद्ध जोरदार भाषणे करतात, मात्र स्थलांतरितांच्या कल्याणासाठी आता-आतापर्यंत ते काम करत होते.

अशा या विचित्र आणि विसंगत वाटणाऱ्या बोरिस यांच्या हाती इंग्लंडची सूत्रे जात आहेत. ब्रिटनचे ‘डोनाल्ड ट्रम्प’ ही त्यांची ओळखच त्यांच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. ट्रम्प आणि बोरिस यांची मैत्री ही त्यातली आणखी एक गमतीशीर बाब. ‘कोणत्याही विचारशील व्यक्तीची झोप उडवायला या मैत्रीचा केवळ उल्लेखही पुरेसा आहे,’ असे ब्रिटिश माध्यमांमध्ये म्हटले जाते. त्यामुळे आता ते काय करतात याकडे संपूर्ण युरोप व जगाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment