श्री एकलिंगजी आणि मेवाडच्या महाराणांंचे असे आहे वर्षानुवर्षांचे भक्तीचे नाते


अनेक राजवंश आणि त्यांच्या इतिहासाने समृद्ध असलेली राजस्थानची संस्कृती आहे. मात्र मेवाड प्रांताच्या राज्यकर्त्यांना ‘महाराणा’ म्हणून संबोधले जात असले, तरी स्वतःला राज्याचे राजे न समजता केवळ राज्याचे रक्षणकर्ते आणि श्री एकलिंगजींना राज्याचे स्वामी मानणारा असा मेवाडचा राजवंश ही याच भूमीतला आहे. उदयपुर शहरापासून वीस किलोमीटर उत्तरेला श्री एकलिंगजींचे प्राचीन मंदिर असून, या ठिकाणी दर्शनासाठी केवळ भारतभरातूनच नाही, तर जगभरातून हजारो भाविक येत असतात. सध्या अस्तित्वात असलेले एकलिंगजींचे मंदिर पंधराव्या शतकामध्ये निर्माण केले गेले असले, तरी मेवाडच्या राज्यकर्त्यांचे आणि श्री एकलिंगजींवर असणाऱ्या त्यांच्या अपार भक्तीचे नाते त्याही पूर्वीचे, सुमारे चौदाशे वर्षांपूर्वीच्या काळापासून चालत आले आहे.

एकलिंगजी मंदिराचे उल्लेख पंधराव्या शतकातील ‘एकलिंग महात्म्य’ या कान्हा व्यास यांच्या संस्कृत ग्रंथामध्ये आढळतात. कान्हा व्यास महाराणा कुंभ यांच्या दरबारी कवी असून, त्यांच्या या ग्रंथामध्ये मेवाड राजघराण्याचे मूळ पुरुष बाप्पा रावळ यांच्याविषयीच्या कथा आहेत. बाप्पा रावळ गहिलोत समुदायाचे राजपुत्र असून, शत्रू समुदायाच्या आक्रमणामध्ये त्याच्या संपूर्ण परिवाराची हत्या केली गेल्यानंतर बाप्पा रावळ अज्ञातवासात रहात होते. त्यावेळी त्यांची भेट हरित ऋषी नामक साधुशी झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत बाप्पा रावळ शिवभक्त बनले. ७५४ साली बाप्पा रावळ यांनी मौर्य राजवंशाच्या ताब्यात असलेला चित्रकूट नामक एक लहानसा किल्ला सर केला. हाच किल्ला पुढे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानला गेला आणि ‘चित्तोडगढ’ म्हणून नावारूपाला आला.

बाप्पा रावळ यांना साधुनी ज्या ठिकाणी शैविक धर्माची दीक्षा दिली, त्याच ठिकाणी बाप्पा रावळ यांनी श्री एकलिंगजी मंदिराचे निर्माण करविले. त्याचबरोबर हरित ऋषींनी बाप्पा रावळ यांनाही श्री एकलिंगजींचे उत्तराधिकारी घोषित करीत राजकारभाराची सूत्रे निश्चित केली. तेव्हापासून बाप्पा रावळ आणि त्यांच्या वंशजांनी श्री एकलिंगजी यांचे उत्तराधिकारी म्हणून मेवाडचे साम्राज्य सांभाळले, वाढविले. १९४७ साली सर्व स्वतंत्र राज्यांचे विलीनीकरण होईपर्यंत ही परंपरा सुरु राहिली. मात्र मेवाडच्या राजवंशामध्ये श्रीएकलिंगजी यांच्या भक्तीची परंपरा आजतागायत सुरु आहे. सध्या हयात असलेले श्रीजी अरविंद सिंह मेवाड हे मेवाड साम्राज्याचे ७६वे वंशज आहेत.

श्री एकलिंगजींचे मंदिर आणि मेवाडच्या राजांसाठी त्यांचे महत्व ओळखून अनेकदा शत्रूंच्या हल्ल्यामध्ये हे मंदिर भंग करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर महाराणा मोकाल यांच्या शासनकाळामध्ये (१४२१-१४३३) निर्माण करविले गेले. त्यानंतर महाराणा रायमल यांच्या शासनकाळामध्ये (१४७३-१५०९) या मंदिरामध्ये शिवलिंग आणि काळ्या संगमरवराची पाच फुट उंचीची पंचमुखी शिवशंकराची मूर्ती स्थापिली गेली. मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप यांच्यामध्ये असलेल्या जागेमध्ये महाराणा भगवत सिंह यांच्या (१९५५-१९८४) शासनकाळामध्ये चांदीचा मंडप बांधण्यात आला.

श्री एकलिंगजी मंदिर हे मेवाड राजवंशाचे खासगी प्रार्थनास्थळ असून या ठिकाणी पूजा आणि अभिषेक करण्याचा अधिकार केवळ मेवाडच्या राजवंशातील परिवारजनांना आहे. मात्र श्री एकलिंगजींचे दर्शन घेण्याची मुभा सर्वच भक्तांना आहे.

Leave a Comment