मुंब्र्यातील मंदिराच्या महाप्रसाद विष कालवणार होते एटीएसने अटक केलेले ‘ते’ आरोपी


मुंबई – या वर्षीच्या जानेवारीमध्ये दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा येथे मोठ्या घातपाताचा डाव उलथून लावला होता. एटीएसने इसिसच्या १० दहशतवाद्यांना अटक केली होती. मुंब्रा येथील मुंबरेश्वर मंदिराची या दहशतवादी तरुणांनी रेकी केली होती आणि महाप्रसादातील जेवणात विष कालवून हजारो भाविकांना मारण्याचा कट रचला होता. या आणि अशा अनेक गोष्टी एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये समोर आल्या आहेत.

मुंब्रा येथील मुंबरेश्वर मंदिर ४०० वर्षे जुने असून १ जानेवारी ते ८ जानेवारी मध्ये भगवद्गीता वाचनाचा कार्यक्रम या मंदिरात आयोजित केला होता. तर महाप्रसाद शेवटच्या दिवशी ठेवण्यात आला होता. ८ ते १० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. पण याच प्रसादात विष कालवून भाविकांना मारण्याचा कट एका बाजूला शिजत होता. हा कट मुंब्रा आणि औरंगाबाद येथील १० तरुण मिळून करत होते. त्यांनी त्यासाठी रेकी देखील केली होती. मात्र, वेळीच कारवाई करुन एटीएसने त्यांना पकडले आणि मोठा अनर्थ टळला, असे एटीएसचे म्हणणे आहे.

चार्जशीटनुसार, यातील काही तरुण हे मुंब्रात राहणारे होते. मंदिराच्या इतिहासाची त्यांना चांगली जाणीव असल्यामुळे येथे घातपात करुन मास किलिंग करण्याचे षडयंत्र त्यांनी आखले होते. यापैकी अबू हमजा नावाच्या त्यांच्या म्होरक्याने बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग घेतली होती. त्याने मुंब्रा बायपासजवळ बॉम्ब फोडून देखील पाहिले होते. त्याने पकडले जाऊ नये, यासाठी आपापसात संपर्क ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅप ऐवजी टेलिग्रामअॅपचा वापर केला. पण या १० जणांनी मुंब्रातील आणखीन ६ जणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. पण हे ६ जण पोलिसांकडे गेल्याने अबू हमजा आणि त्याच्या साथीदारांची बिंग फुटले. नाहीतर महाराष्ट्रात यावर्षी अनेक घातपात आणि रक्तपात बघायला मिळाले असते. जे एटीएसने रोखले आहेत.

Leave a Comment