श्रावण महिन्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला आहे विशेष महत्व


सनातन परंपरेमध्ये भगवान शिवाशंकरांची रूपे असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या साधना-आराधनेला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. पौराणिक मान्यतांच्या अनुसार भगवान शिवशंकर ज्या ज्या ठिकाणी स्वतः प्रकट झाले, त्याच बारा ठिकाणी असलेल्या शिवलिंगांना ज्योतिर्लिंग म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने विशेष फलप्राप्ती होत असल्याची भाविकांची श्रद्धा असून, बारा ज्योतिर्लिंगांच्या नियमित नामस्मरणाने देखील सर्व दुःखे दूर होत असल्याची मान्यता आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवपूजेला मोठे महत्व असून, या महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनालाही विशेष महत्व आहे. गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रामध्ये असलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग, धरातलावरील सर्वप्रथम ज्योतिर्लिंग मानले जाते. शिवपुराणाच्या अनुसार जेव्हा प्रजापती दक्षाने चंद्राला क्षय रोगाने ग्रस्त होण्याचा शाप दिला, तेव्हा याच ठिकाणी शिवाराधना करून चंद्र शापमुक्त झाला असल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच या मंदिरामध्ये पूजा केल्याने भाविक क्षय, महारोग इत्यादी रोगांपासून मुक्त होत असल्याची श्रद्धा आहे. या ठिकाणी ‘पापनाशक कुंड’ किंवा ‘सोमकुंड’ या नावाने ओळखले जाणारे जलकुंड आहे.

आंध्रप्रदेशामध्ये कृष्णा नदीच्या किनारी श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने समस्त पापांचे क्षालन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या कळसाचे दुरून दर्शन घेतल्याने देखील सर्व कष्ट दूर होत असल्याची मान्यता आहे. मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे असणारे महाकालेश्वर मंदिर एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरामध्ये आराधना केल्याने मनुष्याला काळाचे भय उरत नसल्याचे म्हटले जाते. या मंदिरामध्ये दररोज सकाळी होणाऱ्या भस्मारतीमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. मध्यप्रदेश राज्यातील माळवा प्रांतामध्ये ओंकारेश्वर मंदिराचे पावन धाम आहे. हे स्थान इंदूरजवळ नर्मदा नदीच्या किनारी स्थित असून, नर्मदा नदीचा प्रवाह ‘ॐ’ च्या आकारमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले जाते. या मंदिरामध्ये दर्शन घेऊन दानधर्म केल्याने सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होत असल्याचे म्हटले जाते.

उत्तराखंड राज्यामध्ये हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये केदार नामक पर्वतावर केदारेश्वराचे मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून ३५८४ मीटरच्या उंचीवर हे मंदिर उभे असून पुराणांच्या अनुसार भगवान शिवशंकरांचे हे सर्वात आवडीचे स्थान असल्याचे म्हटले जात असल्याने या मंदिराच्या दर्शनाचा महिमा मोठा आहे. महाराष्ट्र राज्यातील पुण्यापासून काही अंतरावर भीमाशंकरचे मंदिर आहे. याच ठिकाणी शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर काही काळ विश्रांती घेतली असल्याची आख्यायिका आहे. याच ठिकाणाहून भीमा नदीचा उगम होत असल्याने या ठिकाणाला भीमाशंकर या नावाने ओळखले जाते. भारताची धार्मिक राजधानी मानल्या जाणाऱ्या वाराणसी येथे असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा महिमाही मोठा आहे. भगवान शंकर स्वतः या ठिकाणी विराजमान असल्याने प्रलय आला तरी देखील हे मंदिर तसेच सुरक्षित राहील अशी भक्तीभावना या मंदिराशी निगडित आहे. भारतामध्ये ज्या चार ठिकाणी कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते, त्यापैकी एक आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर धाम. यापासून जवळच ब्रह्मगिरी पर्वत आहे. याच पर्वतातून गोदावरी नदीचा उगम होतो. गौतम ऋषी आणि गोदावरीच्या आग्रहाखातर भगवान शंकरांनी या ठिकाणी वास्तव्य केल्याची आख्यायिका पुराणांमध्ये उल्लेखलेली आहे.

वैद्यनाथ किंवा वैजनाथ या नावाने ओळखले जाणारे ज्योतिर्लिंग झारखंड राज्यातील संथाल परगण्यात जसीडीह रेल्वेस्थानकाच्या नजीक आहे. श्रावण मासामध्ये या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. गुजरात राज्यातील बडोदा शहराजवळ गोमती द्वारकेच्या नजीक नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. द्वारकापुरीहून हे मंदिर सतरा मैलांच्या अंतरावर आहे. येथे येणाऱ्या सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तामिळनाडू राज्यामध्ये रामनाथम या ठिकाणी रामेश्वरम धाम आहे. याच मंदिराला सेतुबंध तीर्थ या नावानेही ओळखण्यात येते. हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या यात्रा धामांपैकी हे एक क्षेत्र आहे. या ज्योतिर्लिंगाची स्थापना श्री रामांनी केली असल्याची मान्यता असल्याने या मंदिराच्या दर्शनाला मोठे महत्व आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या जवळ असलेल्या दौलताबाद गावाच्या नजीक घृष्णेश्वर क्षेत्र आहे. याच मंदिराचा उल्लेळ ‘शिवालय’ म्हणूनही केला जात असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग समजले जाते.

Leave a Comment