ब्युटी क्वीन पत्नीला मलेशियाच्या माजी राजाने दिला तलाक!


नवी दिल्ली : आपल्या ब्युटी क्वीन पत्नीला मलेशियाच्या केलातनचे माजी शहेनशाह सुल्तान मोहम्मद पाचवे यांनी घटस्फोट दिल्याचे वृत्त आहे. सुल्तानने पत्नी आणि रशियाची माजी ब्युटी क्वीन ओक्साना वोइवोदीना हिला तलाक देतानाच तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर सुल्तान मोहम्मद यांनी ओक्साना हिचे दोन महिन्यांचे मूलही आपले नसल्याचा दावा केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी सुल्तान आणि ओक्साना यांनी तलाकसाठी अर्ज दाखल केला होता. स्थानिक मीडियानुसार, सुल्तान मोहम्मद यांनी मुलाचा जैविक पिता मीच असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा आरोप केला आहे.

२७ वर्षीय ओक्साना हिने ५० वर्षीय सुल्तान मोहम्मदशी निकाह केल्यानंतर इस्लाम कबूल केला होता. तिने यावेळी आपले नावही बदलून रिहाना ओक्साना पेट्रा असे केले होते. इस्माइल लायन असे तिच्या मुलाचे नाव ठेवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यातच सुल्तान मोहम्मद पाचवा यांनी ओक्साना हिच्यासोबत विवाह केला होता. त्यांच्या लग्नाच्या बातमीनंतर मॉडेल पत्नीचे बोल्ड फोटो आणि भूतकाळातील अनेक किस्से मलेशियात व्हायरल झाल्यामुळे मलेशियात मोठा वादही निर्माण झाला होता. सुल्तान मोहम्मदला लग्नाच्या बातम्यांनंतर याच वर्षी जानेवारी महिन्यात राजगादीवर पाणी सोडावे लागले होते.

२०२१ पर्यंत ब्रिटनमधून शिक्षण घेणाऱ्या मोहम्मद हे मलेशियाच्या राजा म्हणून पदभार सांभाळणार होते. परंतु, ब्युटी क्वीन पत्नीसाठी त्यांनी राजपदही सोडले. स्थानिक मीडियानुसार, रिहाना मॉस्कोहून सुल्तान आणि मुलासोबत मलेशियात परतली होती. गेल्याच आठवड्यात आपला तलाक झाला नसून सुल्तान अजूनही आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता. परंतु, सोबतच केतालन राज्याने मंजूर केलेले या दोघांच्या तलाकचे सर्टिफिकेटही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

रशियन मीडियाने केलेल्या दाव्यानुसार, सुल्तानकडून ‘ट्रिपल तलाक’चे पाऊल उचलले गेले असले तरी त्यांची पत्नी मात्र याविरुद्ध आहे. ब्युटी क्वीन ओक्साना रशियन ऑर्थोपेडिक सर्जनची मुलगी आहे. तिने तीन वर्षांपूर्वी मिस मॉस्कोचा खिताब जिंकला होता.

Leave a Comment